Breaking News

गुजरात निवडणूकींसाठी मंत्रीमंडळाचा वापर.

हिवाळी आधिवेशनासाठी मोदी सरकार चालढकल करत असल्याचा काँग्रेसचा आरोप 


नवी दिल्ली : संसदेला सामोरे जाण्यासाठी भाजप सरकार घाबरत असून, अपयश लपविण्यासाठीच ते हिवाळी आधिवेशन पुढे ढकलत असल्याचा गंभीर आरोप बुधवारी काँग्रेस नेते मल्लिकाजुर्न खर्गे यांनी केला. तसेच संपूर्ण मंत्रीमंडळ गुजरात राज्याच्या निवडणूकीत प्रचारासाठी उतरल्याचा आरोप काँगे्रसने केला. तर संसदेवर टाळे ठोकणाऱया काँग्रेसने संसदीय लोकशाहीचे ज्ञान पाजळू नये असे प्रत्युत्तर भाजपने दिले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनावरून मोदी सरकार आणि विरोधी पक्ष समोरासमोर ठाकले आहेत. 

काँग्रेस समवेत अन्य विरोधी पक्षांनी गुजरात निवडणुकीमुळेच मोदी सरकारने संसदेचे हिवाळी अधिवेशन टाळत असल्याचा आरोप केला. मोदी हे ब्रह्मा, सृजनकर्ते आहेत, केवळ तेच संसदेचे अधिवेशन कधी सुरू होईल हे जाणतात अशा उपरोधिक शब्दात खर्गे यांनी हल्ला चढविला. डिसेंबरमध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन आयोजित केले जाईल अशी चर्चा आहे. साधारणपणे हे अधिवेशन नोव्हेंबरच्या तिस़र्‍या आठवडयात सुरू होत डिसेंबरच्या तिस़र्‍या आठवडयापर्यंत चालते. 

परंतु यावेळी हिवाळी अधिवेशनाला होणा़र्‍या विलंबावरून काँग्रेसने मोदी सरकारला लक्ष्य केले. गुजरात विधानसभा निवडणुकीमुळेच मोदी सरकार अधिवेशन टाळत आहे. विविध मुद्यांवर सभागृहात होणाऱया चर्चेपासून सरकार पळ काढत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. अनेक मंत्री, सभापती, लोकसभेचे महासचिव यांच्याशी चर्चा केली, त्यांच्यापैकी कोणालाच हिवाळी अधिवेशन कधी सुरू होईल याची कल्पना नाही. 

केवळ एकच व्यक्ती हे जाणतो आणि मी त्यांना ब्रह्मा म्हणतो. ब्रह्माच्या आदेशापर्यंत आम्हाला याची माहिती कळू शकणार नाही असे म्हणत खर्गे यांनी मोदींना लक्ष्य केले. पुढील महिन्यात होणा़र्‍या गुजरात निवडणुकीमुळेच लोकशाहीच्या मंदिराचे अवमूल्यन केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अपयश लपविण्याचा प्रयत्न 

संसदेचा सामना करणे सरकार टाळत आहे. स्वतःचा भ्रष्टाचार आणि अपयश लपविण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय. मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ आता प्रचार यंत्रणा झाली असून गुजरात तसेच इतरत्र आक्रमक प्रचार करण्यातच त्यांचा वेळ खर्ची पडतोय असा दावा राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी केला. माकप नेते सीताराम येचुरी यांनी सरकारच्या या विलंबाच्या धोरणाला ‘गुजरात मॉडेल’चे नाव दिले आहे. गुजरात विधानसभेत वर्षभरात एक महिना देखील कामकाज चालत नाही, दिल्लीत देखील हेच मॉडेल अवलंबिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 

काँग्रेसने लोकशाहीच्या गप्पा मारू नये : नकवी 

काँग्रेसच्या आरोपांवर प्रतिवार करत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी संसदेवर टाळे ठोकणारे आणि लोकशाहीच्या संस्थांची पायमल्ली करणाऱया पक्षाने संसदीय लोकशाहीच्या गप्पा करू नयेत असे म्हटले. निवडणूक असताना खासदार आणि पक्ष संसदेचे अधिवेशन निवडणुकीनंतर सुरू व्हावे अशा सूचना करतात. निवडणुकीमुळे संसदेचे अधिवेशन विलंबाने सुरू करण्याचे प्रकार काँग्रेसच्या काळात देखील घडल्याचे प्रत्युत्तर नकवी यांनी दिले.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा