अवैध कीटकनाशकांचा 2 कोटींचा माल जप्त
मुंबई : अवैध कीटकनाशकांच्या विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी कृषी आयुक्तालयाने राज्यभर भरारी पथकांच्या माध्यमातून कार्यवाही केली आहे. अकोला, सांगली, जळगावसह राज्यातील विविध भागांमध्ये केलेल्या कार्यवाहीनंतर विनापरवाना तसेच कालबाह्य कीटकनाशके, रासायनिक खते विक्री करणार्या दुकानांवर तसेच उत्पादन कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
साधारण 2 कोटी 23 लाख रुपये किमतीच्या कीटकनाशकांच्या अवैध साठ्याची जप्ती करण्यात आली आहे. हा साठा साधारणतः 20 हजार 771 लिटर आहे, अशी माहिती निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण संचालक मच्छिंद्र घोलप यांनी दिली. राज्य शासनाच्या कृषी विभागाने राज्यभर कृषी आयुक्तालय स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. या भरारी पथकांनी अकोला येथे विक्रेते, वितरकांचे गोदाम तसेच साठवणूकस्थळांची तपासणी केली.
या छाप्यात चार कंपन्यांकडे कीटकनाशक विक्रीचा परवाना नसताना कीटकनाशकांची साठवणूक, वितरण व विक्री होत असल्याचे आढळून आले. या कंपन्यांच्या परवान्यांमध्ये कीटकनाशकांचा समावेश नसताना त्यांनी त्याची साठवणूक, वितरण व विक्री केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून कीटकनाशक जप्त करून त्यांचे विक्री परवाने परवाने रद्द करण्यात आले आहे.