बिस्लेरी पाण्याच्या बाटल्यांवरील नाव आता मराठीमध्ये !
मुंबई : अनधिकृत फेरीवाले,अमराठी पाट्यांच्या विरोधात आंदोलन पुकारल्यानंतर आता मनसेने बाटलीबंद पाणी विक्री करणा-या कंपन्यांच्या बाटल्यांच्या लेबलकडे मोर्चा वळवला आहे.आंध्रप्रदेश- तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही पाण्याच्या बाटल्यांवर स्थानिक भाषेत कंपनीचे नाव नमूद करण्याच्या मनसेच्या मागणीला यश आले असून बिस्लेरी कंपनीने मराठीत नाव प्रसिध्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
बिस्लेरी कंपनीने आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात स्थानिक तेलगू भाषेत बाटलीबंद पाण्याच्या बाटलीवर कंपनीचे नाव प्रसिध्द करण्यास सुरुवात केली. पूर्वी या कंपनीच्या बाटलीवर फक्त इंग्रजी भाषेत नाव प्रसिध्द केले जात होते. पण स्थानिक भाषेत कंपनीचे नाव नसल्यामुळे अनेकदा नक्की कोणत्या कंपनीची पाण्याची बाटली आपल्याला विकण्यात आली आहे याची माहिती अनेकांना होत नव्हती. त्यामुळे दुस-याच कंपनीची पाण्याची बाटली ग्राहकांना देऊन त्यांची फसवणूक करण्यात येत होती, असे कंपनीने केलेल्या पाहाणीत आढळून आले.