भाजप प्रवेशासाठी चंद्रकांत पाटलांकडून 5 कोटींची ऑफर - आमदार हर्षवर्धन जाधव.
औरंगाबाद : भाजप प्रवेशासाठी राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री पाच कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. हर्षवर्धन जाधव हे औरंगाबादमधील कन्नड मतदारसंघाचे आमदार आहेत.
माझ्यासह 25 आमदारांना भाजप प्रवेशासाठी ऑफर दिली होती. गेल्या महिन्यातील दौर्यात चंद्रकांत पाटील यांनी ऑफर दिल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले. निवडून न आल्यास विधानपरिषदेवर घेऊ, इतकेच नाही तर निवडणुकीचा सगळा खर्च आम्ही करु, अशी ऑफरही भाजपने दिल्याचा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या कुरबुरींमुळे भाजप त्रस्त आहे, असे मला चंद्रकांतदादा म्हणाले. त्यामुळे शिवसेनेचे काही आमदार गळाला लागतात का, यासाठी प्रत्येक आमदाराला पाच कोटींची ऑफर देऊन, त्यांना पोटनिवडणुकीत निवडून आणून, त्यांना भाजपमध्ये घ्यायचे आणि शिवसेनेला बाजूला सारायचे, असा आमचा प्रयत्न असल्याचे चंद्रकांतदादांनी मला सांगितले.
तिच ऑफर त्यांनी मलाही दिली होती. तुमच्या बदल्या प्रकरण असेल, कोणाच्या बदल्या करायच्या असतील, तर सगळं मला सांगा आणि तुम्ही राजीनामा द्या. तुम्ही निवडणूक लढा आम्ही तुम्हाला निवडून आणू, पैसे खर्च करु निवडणुकीमध्ये, अशा पद्धतीने मग तुम्ही आमच्यामध्ये सामील व्हा. अशा पद्धतीने शिवसेनेचे इतर आमदारही सहभागी झाले तर शिवसेनेच्या दररोज होणार्या त्रासातून आम्ही मुक्त होऊ, असे त्यांचे म्हणणे होते.
