Breaking News

जनतेची घोर फसवणूक करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक जादूगार - राहुल गांधी

विविध प्रकारे जनतेची घोर फसवणूक करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक जादूगार असल्याचा प्रहार काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला आहे. गेल्या २२ वर्षांपासून नरेंद्र मोदींनी आपले जादूचे प्रयोग दाखवून जनतेची आर्थिक लूट केल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. 


पाटीदार समुदायाचा बालेकिल्ला असलेल्या पाटणमध्ये विराट सभेला संबोधित करताना राहूल गांधींनी भाजप व नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर हल्ला चढविला. एखादा जादूगार खोटेनाटे प्रकार करून दाखवत जनतेची फसवणूक करतो. प्रसंगी लोकांकडून पैसेसुद्धा उकळतो.अगदी त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी एखाद्या जादूगाराप्रमाणे विविध हातखंडे अमलात आणत आहेत. 

जीएसटी व नोटबंदीच्या माध्यमातून मोदी लोकांची आर्थिक लूट करीत आहेत असा आरोप करून बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून राहूल गांधींनी केंद्र सरकारवर असूड ओढले. एकीकडे, गुजरातची जनता जीएसटी विरोधात रस्त्यावर उतरून निदर्शने करीत आहे. मात्र राज्यातील मूठभर उद्योजकांनी चुप्पी साधली आहे.