काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांत तब्बल ९० टक्के घट
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांत तब्बल ९० टक्के घट झाल्याचा दावा जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य यांनी केला आहे. 'याचे संपूर्ण श्रेय काश्मिरी बांधवांना जाते,' असे ते म्हणाले. 'काश्मीर खोऱ्यात गतवर्षी एकाच दिवशी ४० ते ५० ठिकाणी दगडफेक होत होती. त्यात आता तब्बल ९० टक्क्यांची घट झाली आहे. हा एक मोठा बदल आहे,' असे एस.पी. वैद्य यांनी म्हटले आहे.
'आता लोकांच्या स्वभावात बदल झाला आहे. सध्या संपूर्ण दिवसभरात दगडफेकीची एकही घटना घडत नाही. अनेकदा तर आठवडाभरातही असा प्रकार होत नाही. खोऱ्यातील कायदा-सुव्यवस्थेत कमालीचा बदल झाला आहे. याची प्रचीती काश्मीरशी नाते असलेल्या प्रत्येकाला येत आहे,' असे ते म्हणाले. '
कायदा-सुव्यवस्थेतील सुधारणा व दगडफेकीच्या घटनांत झालेली घट यामागे अनेक कारणे आहेत. केवळ 'एनआयए'च्या छापेमारीमुळे स्थिती सुधारल्याचे मला मान्य नाही. 'एनआयए'च्या छाप्यांनी मदत अवश्य केली. मात्र, याचे मुख्य श्रेय काश्मीरच्या जनतेला जाते. असेही पोलीस महासंचालक यावेळी म्हणाले..
