Breaking News

अनिल-माधुरी पडद्यावर पुन्हा एकत्र दिसणार, मात्र ....

गेल्या १७ वर्षांपासून धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि बॉलीवूडचा लखन अनिल कपूर एक साथ दिसले नाहीत. या दोघांना एकत्र अभिनय करताना पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता याची प्रतीक्षा संपली असून लवकरच हे दोघे पडद्यावर पुन्हा एकत्र दिसणार आहेत. मात्र यंदा हे दोघेही रोमान्स करणार नाहीत. 


चित्रपट निर्माता इंदर कुमार यांनी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितला घेऊन 'टोटल धमाल' हा चित्रपट तयार करण्याचा विचार केला आहे. हे 'बेटा' या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, ज्याच्या एका गाण्याने माधुरीला लोकप्रियता मिळाली होती.

 'टोटल धमाल' या चित्रपटाचे शूटिंग जानेवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे खुद्द इंदरकुमार यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे. त्यामुळे कोणत्याही रोमॅण्टिक सीनची अपेक्षा करू नका; परंतु माझ्या चित्रपटात टोटल धमाल असेल, यांचे मी आश्वासन देतो. 

अनिल आणि माधुरीची जोडी ९० च्या दशकापासून सुपरहिट असून त्यांनी 'तेजाब', 'जमाईराजा', 'बेटा', 'किशन कन्हैया', 'राम लखन' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांत एकत्र काम केले आहे. या दोघांनी २००० साली 'पुकार' या चित्रपटात शेवटचा अभिनय केला होता. त्यानंतर या दोघांनी सोबत काम केले नाही आणि आता पुढील वर्षी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हे दोघे एकत्र दिसणार आहेत.