कोथळे कुटुंबियांचा आत्मदहनाचा इशारा.
सांगली, दि. 13, नोव्हेंबर - अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी आरोपी पोलिस अधिकारी- कर्मचार्यांना फाशीची शिक्षा द्यावी व या आरोपींना पाठिशी घालणार्या सांगली शहर पोलिस उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे यांना तातडीने अटक करावी. अन्यथा, संपूर्ण कुटुंब पेटवून घेऊन आत्महत्या करेल, असा इशारा कोथळे कुटुंबियांनी रविवारी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांना दिला. अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाऐवजी केंद्रीय गुन्हा अन्वेषण (सीबीआय) विभागामार्फत करावा, अशी मागणीही या कु टुंबाने केली.दीपक केसरकर यांनी रविवारी दुपारी कोथळे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी या कुटुंबियाने आपल्या संतप्त भावना त्यांच्यासमोर व्यक्त केल्या.
एका खोट्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे याला सांगली शहर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिस कोठडीत अमानुष मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली व हा खून पचविण्यासाठी त्याचा मृतदेह परस्पर जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. अनिकेत कोथळे ज्या दुकानात कामास होता, त्याठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असल्याची कु णकूण त्याला लागल्यानेच त्याचा जीव घेण्यात आला. एकूणच हा प्रकार सुपारी देऊन खून करण्यात आल्याचाच आहे, असा आरोपही कोथळे कुटुंबियाने केला.
या गुन्ह्यातील आरोपी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह त्याच्या साथीदारांना ङ्गाशीची शिक्षा व्हावी, या आरोपींना पाठिशी घालणार्या दीपाली काळे यांच्यासह गिरीश लोहाना याला आरोपी करून अटक करावी, पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांची तात्काळ बदली करावी व हा खून खटला जलदगती न्यायालयात चालवून या खटल्याक ामी सरकारी वकील म्हणून ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी आदी मागण्या केल्या. या घटनेला आठवडा होत आला तरी अद्याप कोथळे कुटुंबियांची फिर्यादही दाखल क रून घेतली नसल्याचे या कुटुंबाने सांगितले. सध्याच्या पोलिस तपासाबाबत कोथळे कुटुंबिय साशंक असून हा तपास केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
अनिकेत कोथळे याच्याबाबत घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणात दोषी असणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल व कोथळे कुटुंबियाला न्याय मिळवून दिला जाईल. कोथळे कुटुंबियांनी आणखी काही पोलिस अधिकार्यांवर कारवाई करण्यासह ज्या काही अन्य मागण्या केल्या आहेत, त्याबाबत गांभीर्याने विचार केला जाईल. या प्रकरणात दोषी असणार्या कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही. कोथळे कुटुंबियाला मदत मिळवून देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच याचा निर्णय जाहीर केला जाईल, अशी ग्वाही दीपक केसरकर यांनी कोथळे कुटुंबियाला दिली.
