Breaking News

सरपंचांनी सर्वांना बरोबर घेऊन गावाचा विकास करावा - शालिनी विखे.

अहमदनगर, दि. 12, नोव्हेंबर - सरकारच्या अनेक योजनांचा निधी आता थेट ग्रामपंचायत स्तरावर मिळत असल्याने सरपंचांना मोठ्या प्रमाणात अधिकार मिळाले आहेत.जिल्हा परिषदेपेक्षा ग्रामपंचायतींचे महत्त्व वाढल्याने निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी सरपंचांनी नियोजन करावे.चौदाव्या वित्त आयोगाचा निधी चांगल्या पध्दतीने खर्च करण्याची भूमिका घेवून सरपंचांनी पारदर्शीपणे काम करावे. नगर जिल्ह्यातील राळेगणसिध्दी, हिवरेबाजार, लोणी बुद्रुक या गावांनी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात विकास साधला आहे.तसाच लोकसहभाग व सर्व सदस्यांना बरोबर घेवून नूतन सरपंचांनी आपल्या गावांचा कायापालट करावा,असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी केले.

नगर जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद सभागृहात जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंचांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षा शालिनी विखे बोलत होत्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी माने म्हणाले की,गावाच्या विकासात सरपंच, सदस्यांना मोठ्या प्रमाणात अधिकार असतात.त्यांनी सांघिक वृत्ती ठेवून काम केले पाहिजे.

अनेकवेळा शासकीय नियमांची माहिती नसल्याने सरपंचांकडून चुकीची कामे होतात व प्रशासनाला कारवाई करावी लागते.हे टाळण्यासाठी सरपंचांनी शासकीय अधिनियम, सरपंचांचे अधिकार, क र्तव्ये याबाबत प्रशिक्षित होणे आवश्यक आहे. उपाध्यक्षा घुले म्हणाल्या की, शेवटच्या घटकाचा विकास हा केंद्रबिंदू मानून नवनिर्वाचित सरपंचांनी काम केले पाहिजे.

पंचायत राज व्यवस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण असल्याने महिला सरपंच मोठ्या प्रमाणात निवडून आल्या आहेत. महिला सरपंचांच्या कामात पतीराजांनी हस्तक्षेप न करता त्यांना काम क रण्यास पूर्ण मोकळिक दिली पाहिजे.योग्य प्रशिक्षण मिळालेल्या महिला सरपंच ठसा उमटविणारी कामे करतील,असा विश्‍वास वाटतो.

जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे यांनी नव निर्वाचित सरपंचांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले.प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांनी प्रास्ताविक केले.यावेळी नवनिर्वाचित सरपंचांना ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणार्या विविध शासकीय योजना,महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कायदेविषयक तरतुदी, महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता 2011 आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.