महिला आणि बाळासह गाडी उचलणारा वाहतूक पोलीस निलंबीत
मुंबई, दि. 12, नोव्हेंबर - मालाड येथे गाडीमध्ये बाळाला दूध पाजत असताना महिलेसह गाडी उचलणा-या वाहतूक पोलिसाचे निलंबन करण्यात आले. शशांक राणे असे असे या वाहतूक पोलिसांचे नाव आहे. यासंदर्भातील ध्वनीचित्रफीत सोशल माध्यमावर प्रसारित झाली असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच रविवारपर्यंत चौकशी करुन अहवाल सादर केले जावेत असा आदेशही त्यांनी दिला आहे.
राखी नावाची महिला आपल्या सात महिन्याच्या मुलाला गाडीत स्तनपान करत होती. तेव्हा वाहतूक पोलीस अधिकारी शशांक राणे यांनी रस्त्याच्या बाजूला उभी असलेली गाडी बाजूला काढण्यास सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर शशांक राणे यांनी गाडीमध्ये महिला आपल्या मुलासोबत बसलेली असतानाही कार उचलली. महिलेने माझ्या मुलाची प्रकृती ठीक नाही अशी विनंती करुनही राणे यांनी गाडी उचलली.
