Breaking News

औरंगाबादचा अजिंक्य कलंत्रीचा राष्ट्रकुल युवा परिषदेत सहभाग.

औरंगाबाद, दि. 12, नोव्हेंबर - मलेशियामध्ये झालेल्या जागतिक राष्ट्रकुल युवा परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान शहरातील अजिंक्य कलंत्रीला मिळाला आहे. मलेशियातील नॉटिंगहॅम विद्यापीठात जागतिक राष्ट्रकुल युवा परिषद पार पडली. 


या परिषदेचे उद्घाटन ब्रिटिश राजघराण्यातील वारस प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते झाले. परिषदेमध्ये भारतातील पाच युवकांचा सहभाग होता. जागतिक शांतता, सामाजिक एकता, समता अखंड ठेवण्याचा, हवामान बदल, शाश्‍वत आणि पर्यावरणपूरक विकासाची प्रतिबद्धता पूर्ण करण्यासाठी सक्रियपणे भागीदार होण्याचा संकल्प जगभरातील सहभागी झालेल्या युवकांनी केला. 

परिषदेत ‘युनायटेड नॅशनल फ्रेम वर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज’च्या वतीने स्वीकारलेल्या ‘गोल 52’ कार्यक्रमात राष्ट्रकुल देशांतील 52 देशांचे युवा प्रतिनिधी तर भारतातील 5 युवक सहभागी झाले होते. यामध्ये औरंगाबादचा अजिंक्य कलंत्री, नाशिकचा विनित मालपुरे, पुणेचा सौरभ नावांदे, पूजा मानखेडकर, पूर्णिमा पवार यांचाही सहभाग होता.