Breaking News

जालना जिल्हयात देवस्थानच्या 25 गायींचा अकस्मात मृत्यू.

जालना, दि. 12, नोव्हेंबर - जालना तालुक्यातील ईदेवाडी व सिरसवाडी शिवारात सुमारे 25 गायी आज (शनिवार) सकाळी मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. गावातील नागरिकांनी गायींचे मृतदेह रस्त्यावर आडवे टाकून रस्ता रोको केला. थामिठ नावाचे विषारी औषध खाल्ल्याने गायींचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून या मागे कुणी घातपात केला आहे का याचाही तपास होत आहे.


आज सकाळी ईदेवाडी शिवारामध्ये सकाळी 20 ते 25 गाय मृतावस्थेत नागरिकांना आढळून आल्या. सदर गायी या येथील देवस्थानाच्या असून दिवसभर आसपासच्या परिसरात चरून रात्री देवस्थानी येत असत. त्या आज सकाळी वेगवेगळया ठिकाणी मृत आढळल्या तर काही गायी अत्त्यवस्थ असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. 

त्यानंतर नागरिकांनी या संदर्भात पोलिस प्रशासनासह जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी, महसूल प्रशासनाला माहिती दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, तहसीलदार बिपीन पाटील, पशुवैद्यकिय अधिकारी जे. एम. बुकतारे यांनी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटना स्थळीच गायींचे शवविच्छेदन केले. या घटनेची माहिती मिळताच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे दुखावलेल्या गावक-यांनी काही काळ रस्ता रोको केला.