Breaking News

वीजबिल भरणा सुलभ होण्यासाठी ’कृषी संजीवनी योजना’

अहमदनगर, दि. 2, नोव्हेंबर - थकीत वीजबिलामुळे सध्या महावितरणने वीज खंडित करण्याची मोहीम राबवली आहे.थकीत बिलाची रक्कम मोठी असून त्यावरील व्याज व दंड  यामुळे ही रक्कम फुगत चालली आहे. यासाठी शेतकर्‍यांना व्याज व दंड माफ करून  शेतकर्‍यांना वीजबिल  भरता यावे  यासाठी कृषी संजीवनी योजना-2017 सुरु करण्यात आली  आहे.या योजनेमुळे वीज बिलांची थकबाकी असलेल्या शेतकर्यांना दंड आणि व्याज बाजूला ठेवून मूळ थकबाकी पाच समान हप्त्यात भरण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली  आहे.
सदर योजनेअंतर्गत  थकबाकीच्या मूळ रक्कमेचे पाच समान हप्ते करण्यात आले असून एक हप्ता मूळ थकबाकीच्या 20 टक्के आहे.  चालू वीज बिल 15 नोव्हेंबर 2017 पर्यंत भरुन  डिसेंबरपासून मूळ थकबाकीपैकी 20  टक्क्यांचा पहिला हप्ता थकबाकीदार शेतकर्यांना भरवा लागेल.
मार्च 2018 मध्ये 20  टक्के, जूनमध्ये 20  टक्के, सप्टेंबरमध्ये 20 टक्के व डिसेंबर 2018 अखेरीस 20  टक्क्यासह पूर्ण थकबाकी महावितरणकडे भरावयाची आहे.
शेतकर्यांवर थकीत वीज बिलांचा अधिक भार पडणार नाही हे लक्षात घेवून शासनाने शेतकर्यांकडील मूळ थकीत रक्कमेच पाच समान हप्ते केले आहे.