Breaking News

रत्नागिरीत दोन किलो गांजासह तिघांना अटक

रत्नागिरी, दि. 02, नोव्हेंबर - शहरातील मच्छीमार्केट येथे गांजा घेऊन आलेल्या तिघांना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्यांच्याकडून दोन किलो गांजा  जप्त करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान आरोपींनी पोलिसांना विरोध केल्याने घटनास्थळी शीघ्रकृती दल तैनात करण्यात आले होते. उशिरापर्यंत पोलीसांची कारवाई सुरु होती. 
मच्छीमार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना मिळाली होती. त्यानंतर इंगळे यांनी शहर पोलिसांच्या गुन्हे  प्रकटीकरण शाखेच्या मदतीने मच्छीमार्केट परिसरात सापळा लावला होता. काल (दि. 31 ऑक्टोबर) रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास अश्रफ ऊर्फ अडर्‍या मेहम्मुद शेख, दाऊद  अल्लाउद्दीन होडेकर, अनिकेत किशोर ठाकूर या तिघांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून दोन किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
रत्नागिरी शहरातील काही भागात गांजाची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी अनेक दिवस सुरू आहेत. दोन महिन्यांपूर्वी शहर पोलिसांनी गांजा जप्त केला होता.  त्यानंतरही शहरातील काही भागात गांजाची विक्री सुरू होती. मंगळवारी रात्री मच्छीमार्केट येथे दोन किलो गांजा जप्त केल्यानंतर तिघांना ताब्यात घेण्यात आले. या तिघांकडून रत्ना गिरीतील गांजाच्या टोळीची माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, ताब्यात घेलेल्या तिघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत  ठेवण्याचे आदेश दिले आहेत.