Breaking News

ट्रक-बसच्या अपघातात आठ जणांचा मृत्यू

लातूर, दि. 19, नोव्हेंबर - औसा तालुक्यातील कलबुर्गा पाटीजवळ ट्रक-बसचा मोठा अपघात झाला असून या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आज दुपारी तीन वाजता औसा निलंगा राज्य महामार्गावर हा भयानक अपघात झाला. यात वीस जण जखमी झाले आहेत.


औशाकडून निलंग्याला निलंगा डेपोची बस (एमएच 20 डी 9611 ) निघाली होती. तेव्हा चलबुर्गा फाटयाजवळ निलंग्याकडून औशाकडे येणारा ट्रक (क्र. एमएच 13 एके 4831) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. बस गच्च भरलेली होती. बसमध्ये चालक वाहक धरून त्र्याहत्तर जण होते. बसच्या चालकाच्या केबीनपासून त्यामागील पाच सीटपर्यंत बसची उजवी बाजु ट्रकच्या धडकेने कापली गेली असून अक्षरश: बस फाटली होती. 

या अपघातात 10 पेक्षा अधिक प्रवासी ठार झाल्याचा अंदाज घटनास्थळी उपस्थितांनी व्यक्त केला आहे. अपघात झाल्यानंतर एकच आरडा ओरडा आणि रडारडी झाली. अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी लातूर , लामजना, औसा येथे हल विण्यात आले आहे. दोनही वाहने वेगात होती. बसमध्ये प्रवासी जास्त होते आणि या मार्गावर खड्डे आहेत. या सगळया कारणाने हा अपघात झाला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.