Breaking News

सौरऊर्जेद्वारे तीन वर्षात राज्यातील शेतकर्‍यांना दिवसा वीज - मुख्यमंत्री

अहमदनगर, दि. 05, नोव्हेंबर - सोलर फीडरच्या माध्यमातून येत्या तीन वर्षात राज्यातील कानाकोपर्‍यात शेतकर्‍यांना वीज उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे आगामी काळात  शेतकर्‍यांना स्वस्त आणि खात्रीची वीज उपलब्ध होऊ शकेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे आयोजित मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच ग्रामरक्षक दलाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच मेळावा कार्यक्रमात ते  बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे होते.
श्री. फडणवीस म्हणाले, वीज क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने सोलरद्वारे निर्मित वीज फीडरला जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला शेतकर्‍यांना सौर पंप  देण्याची योजना होती. मात्र, सौरपंप वितरित करण्याला मर्यादा असतात, असे लक्षात आल्यावर शेतकर्‍यांना दिवसा 12 तास खात्रीची वीज देण्यासाठी कृषी पंपांना वीजपुरवठा क रणार्‍या फीडरनाच सोलर पॅनेलने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. याची सुरुवात ग्रामविकासाच्या क्षेत्रात मानदंड निर्माण करणार्‍या ज्येष्ठ समाजसेवक अण्णांच्या राळेगणसिद्धी  गावातून होत असल्याने हा ऐतिहासिक दिवस असल्याचे त्यांनी नमूद केले.
सोलर पॅनेलद्वारे सर्व फीडर जोडण्यात येणार असून त्याद्वारे शेतकर्‍यांना दिवसा 12 तास स्वस्तात आणि खात्रीची वीज मिळणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले  की, सध्या वीजनिर्मितीचा एका युनिटचा दर हा साधारणत: 6.50 रुपये इतका आहे. सौर ऊर्जा निर्मितीचा प्रति युनिट खर्च हा 3 ते 3.25 रुपये एवढा आहे. ती वीज शेतकर्‍यांना  1.20 रुपये दराने दिली जाणार आहे. त्यामुळे प्रतियुनिट निर्मिती खर्च वाचणार असल्याने तो पैसा शेतकर्‍यांच्या विकासासाठी वापरता येईल.