Breaking News

कल्याणचे प्रसिद्ध विधिज्ञ श्रीनिवास चिंतामणी यांचे निधन

कल्याण, दि. 05, नोव्हेंबर - कल्याणकरांचे आदरणीय व प्रसिद्ध विधिज्ञ श्रीनिवास चिंतामणी तथा भाऊसाहेब मोडक यांचे 92 व्या वर्षी निधन झाले. अनेक मान्यवरांच्या  उपस्थितीत त्यांच्यावर आज आधारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 
भाऊसाहेबांचा जन्म कल्याण येथे 1925 साली विजयादशमीच्या दिवशी झाला. त्यांचे शालेय शिक्षण कल्याण व उच्च शिक्षण मुंबईला झाले. वडील बापूसाहेब मोडक हेही ठाणे  जिल्ह्यातील प्रसिद्ध वकिल व रा.स्व.संघाचे ठाणे जिल्हा संघचालक होते. त्यामुळे संघाचे व्दितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी व संघाच्या अनेक आधिकार्यांचा सहवास त्यांना  लाभला. भाऊसाहेब कल्याण-ठाणे परिसरातील फौजदारी व दिवाणी वकील होते. भिवंडी दंगल, दुर्गाडी किल्ला मंदिर दावा, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, आणीबाणी, रामजन्मभूमी  आंदोलनातील कार्यकर्त्यांचे खटले, यातील अनेक दावे सामाजिक जाणीवेपोटी त्यांनी मोफत चालविले. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकिय नेत्यांचे खटले  त्यांनी लढविले. कल्याणच्या वकिल संघटनेचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. जिल्हा सत्र न्यायालय कल्याणमध्ये आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कल्याणच्या सार्वजनिक  वाचनालय, जनता बँक व इतर अनेक संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. त्यांच्या मागे त्यांचे पुतणे पुणे जिल्हा प्रमुख सत्र  न्यायाधीश श्रीराम मोडक, सून, पुतणी, जावई व नातवंडे आहेत. कल्याणकरांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभा रविवार 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6  वाजता सार्वजनिक वाचनालय शिवाजी चौक कल्याण येथे आयोजित करण्यात आली आहे.