Breaking News

अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज नष्ट करणारा तंत्रज्ञ ताब्यात ?

सांगली, दि. 20, नोव्हेंबर - अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी तपासात महत्त्वपूर्ण असलेल्या सांगली शहर पोलीस ठाण्याकडील सीसीटीव्ही फुटेज नष्ट करणा-या तंत्रज्ञास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने रविवारी दिवसभरात आरोपी युवराज कामटे याच्यासह तीन पोलीस कर्मचा- यांच्या घरावर छापा टाकून तपासणी करतानाच या चौघांचीही कसून चौकशी केली. मात्र हे सर्वजण या तपासात असहकार्य करीत असल्याचे सांगण्यात आले.


सांगली शहर पोलिसांच्या अमानुष मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पोलीस ठाणे परिसरातील सीसी टिव्ही फुटेज नष्ट करण्यात आले होते. हे फुटेज नष्ट करण्यासाठी युवराज कामटे व त्याच्या सहका-यांनी एका तंत्रज्ञाची मदत घेतली होती. राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या चौकशीत या तंत्रज्ञाचे नाव पुढे आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडेही या संपूर्ण प्रकरणाबाबत सखोल चौकशी केली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणा-या अनिकेत कोथळे खूनप्रकरणी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडून जलदगतीने तपास केला जात आहे. या तपासकामी अधिक चौकशीसाठी दोन दिवसापूर्वी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद सांगली येथे आले होते. काल रात्री उशिरा सुनील रामानंद यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे व सांगली शहर पोलीस उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याकडून या घटनाक्रमाबाबतची माहिती जाणून घेतली, तर रविवारी आंबोली घाट येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.
रविवारी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या एका पथकाने युवराज कामटे, नसरूद्दीन मुल्ला, अनिल लाड व अरूण टोणे या चौघांच्या घरावर छापा टाकून तपास केला. युवराज क ामटे याच्या विश्रामबाग परिसरातील स्फुर्ती चौक येथील व्यंकटेश आर्केड या सदनिकेत जाऊन माहिती घेतली. त्यावेळी या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर या चौघांचीही रात्री उशिरापर्यंत राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या येथील रिसाला रस्त्यावरील कार्यालयात इन कॅमेरा सखोल चौकशी सुरू होती. मात्र हे सर्वजण या चौकशीत असहकार्य करीत असल्याची चर्चा आहे.
अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी आतापर्यंत सुमारे 30 जणांची चौकशी करण्यात आली आहेत. त्यात त्या दोन व्यापार्यांसह मूळ प्रकरणातील ङ्गिर्यादी याचाही समावेश आहे. दरम्यान, अनिकेत कोथळे याच्या हत्येनंतर त्याचा साथीदार अमोल भंडारे याला कृष्णा नदीकाठी ताब्यात ठेवणार्या दोघांची अद्याप पुरेशी माहिती सामोरी आलेली नाही. या हत्या प्रकरणाच्या नेमक्या ठोस कारणापर्यंत राज्य गुन्हा अन्वेषण विभाग पोहोचला असून लवकरच याचा खुलासा होणार असल्याचेही सांगण्यात आले.