Breaking News

पिंपरी पँथर्स संघाला प्लॅटिनम तर नाशिक एव्हरशाईनला सुवर्ण पदक

नाशिक, दि. 20, नोव्हेंबर - गेल्या तीन दिवसापासून (दि. 17) नाशिक शहरात सुरु असलेल्या तीन दिवसीय क्रिकेट महाकुंभात पिंपरी पँथर्स संघाने सर्वच आघाड्यांवर जोरदार कामगिरी करत पहिल्या क्रमांकाचे प्लॅटिनम पदक मिळवले तर यजमान नाशिक एव्हरशाईन गोल्ड मेडल मिळवत स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. तर नागपूर ऑरेंज सिटीने सिल्वर तर थ्री के तमील्सने इलाईट पदकावर मोहर उमटवली. इंटरनॅशनल फेलोशिप क्रिकेट लव्हींग रोटरीयन व मंत्रा ग्रीन रिर्सोस यांच्या विद्यमाने हा क्रिकेट महाकुंभाचे पारितोषिक वितरण मिसेस महाराष्ट्र आयकॉन पूनम बेडसे, आयएफसीआर वर्ल्डचे सेक्रेटरी केआरपी सारथी आयएफसीआर इंडियाचे चेअरमन चित्तरंजन चौधरी, व्हाईस चेअरमन आर. नीलकंठ, आयएफसीआर वर्ल्डचे माजी चेअरमन रवीरमण, डीजीई इलेक्ट 1920चे राजेंद्र भामरे यांच्या हस्ते गोल्फ क्लब मैदानावर संपन्न झाला. 


पिंपरी पँथर्स, नाशिक एव्हरशाईन, रायगड वॉरीअर्स, कुंभकोणम, पुणे 3131 या संघांनी साखळी फेरीपासूनच गुणतालिकेत वरच्या स्थानावर राहत स्पर्धेवर वर्चस्व राखले होते. क्रिकेट महाकुंभाचे अंतिम सामने रंगणार असून मैत्रीपूर्ण वातावरणात होत असलेल्या या स्पर्धेत साखळी सामन्यानंतर गुणतालिकेत प्रथम आठ संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
सर्वाधिक सरासरी असलेल्या पिंपरी पँथर्स आणि रायगड वोरिअर्स संघांत प्लॅटिमन पदकासाठी लढत रंगली. त्यात पिंपरी पँथर्सने 20 षटकांत 183 धावांचा डोंगर उभारला. त्यास प्रतिउत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या रायगड वोरिअर्स संघाचा डाव केवळ 130 धावांत आटोपला. यात पिंपरी पँथर्सचे शेखर दालमिया यांनी अष्टपैलू खेळ करत संघाला विजय मिळवून दिला. त्याबद्दल त्यांना सामनावीराचा पुरस्कार मिळाला. नाशिक एव्हरशाईन संघाने आज झालेल्या दुसर्‍या अंतिम सामन्यात कुंभकोणम संघासमोर तब्बल 193 धावांचे लक्ष्य ठेवले. कुंभकोणम संघाला मोठे आव्हान असताना सुरुवातीपासूनच गळती लागल्याने त्यांचा दावा 130 धावांतच आटोपला. नाशिक एव्हरशाईनचे संतोष दिंडे यांनी 30 धावा आणि 2 गडी बाद करताना अष्टपैलू कामगिरी करत सामनावीर ठरले.
तिसर्‍या अंतिम सामन्यात नागपूर ऑरेंज सिटी संघाने आयएफसीआर पुणे 3131चे 152 धावांचे आव्हान केवळ 15.4 षटकांत पूर्ण करत सिल्वर मेडल पटकावले. तर अखेरच्या सामन्यात थ्री के तमिळ संघाने मद्रास सुपर किंग्सवर मोठा विजय मिळवत इलाईट पदक कप मिळवला.
स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार नाशिक एव्हरशाईनचे संतोष दिंडे यांना मिळाला. त्यांनी 5 सामन्यांत सर्व सामन्यात नाबाद राहत 90 धावा आणि 5 बळी मिळवले. पुणे 3131चे ज्ञानेश्‍वर झेंडे यांनी 118 धावा करत सर्वोत्कृष्ट फलंदाज तर विनोद कर्डिले यांनी चार सामन्यात सात बळी मिळवत स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरले. महाकुंभ यशस्वी होण्यासाठी आयएफसीआर डिस्ट्रीक्ट 3030 चे चेअरमन तुषार चव्हाण, डॉ. यु.के.शर्मा, बाळा राठी, आशा वेणुगोपाल, संतोष दिंडे (सचिव), विनोद कर्डिले, संजय कलंत्री, महेश उपाध्ये, डॉ. अनिरूध्द भांडारकर, डॉ. भूषण नेमाडे, विनोद जाधव, सचिन पाटील आदी परिश्रम घेत आहेत.
येत्या जानेवारीत श्रीलंकेत रंगणार रोटरी क्रिकेट मिनी फेस्टिवल - पुढील वर्षी जानेवारी महिन्यात श्रीलंकेत रोटरी क्रिकेट मिनी फेस्टिवल घेण्याची घोषणा आयएफसीआर इंडियाचे चेअरमन चित्तरंजन चौधरी यांनी केली 1997 मध्ये उदयास आलेल्या इंटरनॅशनल फेलोशिप क्रिकेट लव्हींग रोटरी अंतर्गत 10 देशांत वर्ल्ड रोटरी क्रिकेट फेस्टिवल घेतला जातो. सर्वच रोटरी क्लब्सना या फेस्टिवल मध्ये सहभागी करून घेण्याचा मानस यावेळी रिचर्ड यांनी व्यक्त केला. मैत्रीपूर्ण वातावरणात घेतल्या जाणार्‍या या सामन्यांत रोटरी सदस्यांची जागतिक स्तरावर नोंद ठेवली जात असून 2009 पासून बीसीसीआयच्या धर्तीवर नियोजन केले जात आहे. या क्लबचे भारतात 800 तर जगभरात एकूण 2000 सदस्य आहेत. ऑगस्ट 2018 मध्ये श्रीलंकेत मिनी क्रिकेट फेस्टिवल तर 2019 मध्ये जागतिक स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.