Breaking News

कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी सोमवारी थायलंड दौर्‍यावर

रत्नागिरी, दि. 05, नोव्हेंबर - कोकण मराठी साहित्य परिषदेचे 45 पदाधिकारी, सभासद सिंगापूर-थायलंडच्या 8 दिवसांच्या दौ-यासाठी सोमवारी 6 नोव्हेंबर रोजी मुंबईतून रवाना  होणार आहेत.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, प्रमुख विशस्त मधू मंगेश कर्णिक, अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, कार्याध्यक्षा नमिता कीर, विशस्त अरुण नेरूरकर, रमेश कीर या दौ-यामध्ये सहभागी  होणार आहेत. सिंगापूरमध्ये ‘साहित्य संवाद’ हा साहित्यिक कार्यक्रम कोमसाप आणि सिंगापूर येथील महाराष्ट्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे. संध्याकाळी 4 ते 9  या वेळेत होणा-या या कार्यक्रमात बोलीभाषेचा ‘बोली कवतिके’, कथाकथन, विविध क्षेत्रातील लोकांची साहित्यिक आवड या विषयावरील साहित्याचा लळा, काव्यसंमेलन,  नाट्यप्रवेश सादरीकरण इत्यादी कार्यक्रम सादर केले जातील.
‘साहित्य संवादा’चे अध्यक्षपद कर्णिक भूषविणार असून उद्घाटक रमेश कीर आणि स्वागताध्यक्षा डॉ. अस्मिता तडवळकर (महाराष्ट्र मंडळ-सिंगापूर) आहेत. भारताबाहेर जेथे जेथे  मराठी लोक विखुरलेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधणे आणि मराठी भाषेचा प्रसार आणि संवर्धनासाठी प्रयत्नशील राहणे हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागील हेतू आहे.  थायलंडमधील पट्टाया येथेही 11 नोव्हेंबरला दोन तासांचा साहित्यिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या दौर्याची आणि साहित्यिक उपक्रमांची जबाबदारी नमिता कीर (प्रमुख),  रवींद्र आवटी, एल. बी. पाटील, जनार्दन पाटील, गजानन म्हात्रे, शशिकांत तिरोडकर यांनी उचलली आहे.