Breaking News

ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करण्याचे ठाणे सत्र न्यायालयाचे आदेश

ठाणे, दि. 05, नोव्हेंबर - दोन हजार कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्या प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ठाणे सत्र न्यायालयाने  दिले आहेत. ठाणे गुन्हे शाखेने 23 जून 2017 रोजी ममताला फरार घोषित केले होते. त्यानंतर 30 दिवसांत न्यायालयासमोर हजर रहाण्याची मुदत ममताला देण्यात आली होती.  मात्र ती हजर न झाल्याने अखेर न्यायालयाने तिची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. ममता सध्या केनियामध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
13 एप्रिल 2016 रोजी ठाणे पोलिसांनी दोन आरोपींकडून 12 लाख रुपये किंमतीचा इफेड्रीन नावाचे अंमली पदार्थ जप्त केले होते. या दोघांची अधिक चौकशी केली असता अंमली  पदार्थांची देश विदेशात तस्करी केली जात असून यामागे मोठे रॅकेट असल्याचे उघड झाले. याप्रकरणत ममता व तिचा पती विकी गोस्वामी हेही आरोपी आहेत. ममताला फरार घो षित करण्यात येऊन न्यायालयाने अटक वॉरंटही बजावले होते. मात्र या आदेशाला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान ममता विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावली जावी,  यासाठी राज्य गृह विभागाकडून केंद्रीय गुप्तचर विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.