Breaking News

नोटाबंदी निर्णय घेताना दिलेली कारण गैरलागू : प्रा. डॉ. पाटील

सातारा, दि. 10 (प्रतिनिधी) : नोटाबंदीचा निर्णय घेताना एक वर्षापूर्वी सरकारने दिलेली कारणे गैरलागू आहेत. चलन वापरण्याचा मला अधिकार आहे, ही भूमिका नागरिकांनी  घ्यायला हवी होती. ती घेतली गेली नाही, अशी खंत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांनी व्यक्त केले.
येथील परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीतर्फे नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त पाठक हॉलमध्ये आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ’नोटबंदी वर्षपूर्ती एक सिंहावलोकन’ या विषयावर  ते बोलत होते. 
डॉ. पाटील म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय अप्रस्तुत, अतर्किक, अविचारी अशा प्रक्रियेने पुढे आला. त्यासाठी दिली गेलेली कारणे तर्काच्या कसोटीवर टिकत नाहीत. सर्वसामान्य  व्यवहारासाठी रोख पैसा वापरणे शहाणपणाचे असते. सर्व व्यवहार डिजिटल व्हावेत, असा आग्रह धरणे अतिरेकीपणाचे आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी 500 आणि 1000 च्या  नोटा बंद करताना दोन हजाराची नोट सुरु करणे म्हणजे सरकारने अनुसरलेल्या धोरणाविरुध्द आहे. लहान नोटा मोठ्या प्रमाणात चलनात आणल्या असत्या तर सर्वसामान्यांना  नोटाबंदीच्या यातना सोसाव्या लागल्या नसत्या. नोटाबंदीचा निर्णय  रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाने काळजीपूर्वक घ्यायचा असतो, पंतप्रधानांनी नव्हे. नोटाबंदीमुळे वृध्दीदर कमी होऊन  देशातील बेरोजगारीत वाढ झाली, असे मत डॉ. पाटील यांनी यावेळी मांडले. प्रा. भास्कर कदम यांनी स्वागत केले.