Breaking News

सर्वांगिण विकासासाठी चर्मकार ऐक्य परिषद मैलाचा दगड ठरेल : बाबुराव माने

सातारा, दि. 10 (प्रतिनिधी) : फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी निर्माण केला, त्या संत रोहिदास यांनी मानवाच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले. अंधश्रध्देवर  त्यांनी ओघवत्या वाणीतून प्रहार केले. समाजाला सत्याची जाणीव करुन दिली. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून चर्मकार बांधवांसाठी शिखर संस्था असलेल्या चर्मकार ऐक्य परिषदेने  झंझावात सुरु केले आहे. चर्मकार समाज बांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी ही परिषद मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन माजी आमदार व परिषदेचे राज्याध्यक्ष बाबुराव माने यांनी  केले.
चर्मकार ऐक्य परिषदेच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील कोअर कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राज्यातून आलेले ऐक्य परिषदेचे पदाधिकारी लक्ष्मणराव घुमरे,  चंद्रप्रकाश देगलुरकर, शारदाताई नवले, अ‍ॅड. कदम, स्वप्निल मोरे, प्रकाश शिंदे, सूर्यकांत कदम, ज्ञानदेवराव वरपे, दुधबे व महाराष्ट्रातून आलेले कोअर कमिटीचे सन्माननीय पदा धिकारी उपस्थित होते. प्रारंभी विश्‍वसंत रोहिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलन केले.
सध्या चर्मकार समाजावरील वाढत्या अन्यायाबाबत चिंता व्यक्त करताना पारंपारिक व्यवसाय जतन करताना शिक्षणाची कास ज्यांनी धरली, असे बांधव आता विविध क्षेत्रात आपली  गुणवत्ता सिध्द करीत आहेत. त्यांच्या सहकार्याने नवीन पिढीला उद्योग, व्यवसाय, शिक्षण क्षेत्रात संधी प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न ऐक्य परिषदेच्या माध्यमातून सुरु आहे. औरंगाबाद,  नाशिक, नगर, ठाणे, पुणे, मुंबई, कोकण व आता पश्‍चिम महाराष्ट्रात चर्मकार बांधवांनी कार्यरत असलेल्या 70 संघटनांची शिखर संस्था म्हणून चर्मकार ऐक्य परिषदेला स्विकारले  आहे. त्यामुळे सर्व पदाधिकार्‍यांची जबाबदारी वाढली आहे. न्याय, हक्कांचा लढा सुरुच ठेवणार असून आता चर्मकार बांधवांमध्ये झालेली जनजागृती प्रेरणादायक आहे, असेही माने  यांनी स्पष्ट केले.
सध्या महाराष्ट्रातील 60 ते 70 लाख चर्मकार समाज विखुरलेला होता. आता परिषदेच्या माध्यमातून बंधुत्वाची साखळी निर्माण झाली आहे. या साखळीचे आपण प्रत्येकजणकडे  आहोत. ही साखळी हिच आपली ताकद आहे, असे मान्यवर पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. या बैठकीचे नियोजन सांगलीचे विजय सातपुते व त्यांच्या सहकार्‍यांनी यशस्वीरित्या केले.  यावेळी सांगली परिसरातील कवठे-महांकाळ, जत, वांगी, भिलवडी, मिरज, कुपवाड, आटपाडी, जयसिंगपूर, माण, कराड, खटाव येथूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते परिषदेच्या बैठक ीला उपस्थित होते. लवकरच मुंबई याठिकाणी नववर्षात चर्मकार बांधवांचा भव्य मेळावा घेतला जाणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युवा कार्यकर्ते विलास काळे यांनी  सूत्रसंचालन केले. हणमंत कारंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.