Breaking News

वैद्यकीय क्षेत्राचा उपयोग सामान्यांच्या सेवेसाठी व्हावा - डॉ. मोहन भागवत

पुणे, दि. 11, नोव्हेंबर - देशामध्ये सामान्य माणूस शिक्षण आणि आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य देतो. ही दोन्ही क्षेत्र सामान्यांच्या दृष्टीने सुलभ असायला हवीत; परंतु ती दुर्लभ होत चालली आहेत. वैद्यकीय चिकीत्सा म्हणजे व्यापार नव्हे. या क्षेत्राचा उपयोग सामान्यांच्या सेवेसाठी व्हायला हवा, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली. 
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उभारण्यात आलेल्या पुसाळकर अणुवैद्यक व क्ष’ किरण केंद्राचे उद्घाटन डॉ. भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. रुग्णालयाचे विश्‍वस्त व ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, विजय पुसाळकर, तनुजा पुसाळकर, रुग्णालयाचे वैद्यकिय संचालक डॉ. धनंजय केळकर आदी उपस्थित होते.
भागवत म्हणाले, आपल्या मनाची संवेदना कायम ठेवण्यासाठी सतत चिंतन करावे लागते. मनाची मशागत रोज करावी लागते. आपल्या विचारांना उजाळा देत राहणे आवश्यक असते. समाजाप्रती संवेदना असणे आणि समाजाकडून जे मिळाले त्याची परतफेड करणे आवश्यक असते. आपण फळाची अपेक्षा न करता कर्तव्य पार पाडायला हवी. वैद्यकीय चिकीत्सा क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींनी कोणत्याही फळाची अपेक्षा करणे योग्य नाही. जनतेच्या सेवेसाठी या क्षेत्राचा विचार व्हायला हवा. त्यासाठी चिकीत्सकांमध्ये संवेदना तयार होणे गरजेचे आहे. सध्या होमिओपॅथी, लोपॅथी आणि आयुर्वेदीक क्षेत्रातील चिकीत्सकांचा परस्परांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. परंतु, ही मंडळी विभागली गेली आहे, असेही भागवत यांनी सांगितले.