विश्वास आणि श्रद्धेने परमेश्वराची भेट घडते;बिशप एलायस गोनसालवीस
सोनई/ प्रतिनिधी /:- मानवाने परमेश्वरावर विश्वास व श्रद्धा ठेवल्यास परमेश्वराची भेट घडते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने मुलावर योग्य संस्कार करून ते प्रत्यक्ष कृतीत उतरून दाखवावे असे मार्गदर्शनपर वक्तव्य अमरावती धर्म प्रांताचे महागुरू स्वामी बिशप एलायस गोनसालवीस केले.
घोडेगाव तालुका नेवासा धर्म ग्रामच्या ख्रिस्त राजा चर्च यात्रा प्रसंगी पवित्र मिस्सा बलिदान कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. या वेळी विविध धर्म ग्रामातून फादर, सिस्टर आदी उपस्थित होते.
बिशप गोनसालवीस पुढे म्हणाले की, प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा मेंढपाळ आहे. प्रत्येक कुटुंब ही ख्रिस्ताची शाळा आहे. म्हणून प्रत्येक माणसाबद्दल प्रेम असावे. चुकीच्या शब्दाला माफ करून गरीब, आजारी, दीन - दुबळे, ची सेवा करून ख्रिस्ताची सेवक होण्याचे आवाहन त्यांनी भक्तांना केले. तत्पूर्वी सायंकाळी 4 वाजता ख्रिस्त राजाच्या प्रतिमानी सजवलेल्या गाडीतून बिशप गोनसालवीस व फादर सुरेश साठे यांच्या उपस्थितीत भव्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. फादर संजय पठारे यांच्या सह कवायर ग्रुप चा संगीतमय कार्यक्रम झाला.
चर्च व परिसरात उत्साहाचे वातावरण होते . आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. ह्या वर्षी यात्रेला सहा हजाराहून भाविकांनी हजेरी लावली या यात्रेत कटलरी, धार्मिक वस्तूचे भांडार आरोग्य सेवा पार्किंग व्यवस्था ,पिण्याचे पाणी, आदी सुविधा पुरवण्यात आल्या. यात्रेसाठी मुंबई ,पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद सह ग्रामीण भागातून भक्तगण आले होते.
यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी घोडेगाव चर्च प्रमुख धर्म गुरू फादर सुरेश साठे, फादर संजय पठारे, फादर मुक्ती प्रसाद, फादर संदीप कोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरिस कमिटीचे पदाधिकारी सर्व सदस्य, स्वयंसेवक, धर्म भगिनी,युवा ग्रुप, ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता गाढवे यांनी तर आभार मनोहर भालेरावनी केले. शेवटी महाप्रसाद व भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.