कायदेविषयक उपक्रमाचा फायदा सर्व घटकांना : इटकळकर
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये तालूका विधी सेवा समिती राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘न्यायालय आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत कायदेविषयक माहिती, प्रचार, प्रसार करताना भित्तीपत्रके, जनजागृती, मोटारसायकल फेरी, गावागावांत, वाड्यावस्त्यावर नागरिकांच्या भेटी घेत न्यायालयीन पथकाने सर्वसामान्यांमधे कायदेविषयक जनजागृती केली. न्यायालयीन बाबी व जनतेच्या अडीअडचणी समजून घेत प्रबोधन करण्यात आले. न्यायदानाच्या प्रक्रिया व करण्यात येणारे सहकार्य याचे शहर व तालुकाभरात अभियान राबविण्यात आले. संपूर्ण सप्ताहात विविध उपक्रम हाती घेत नागरिकांना न्यायव्यवस्था व कायद्याचे ज्ञान याचे जनतेस महत्व पटवून दिले. या जनजागृती सप्ताहाच्या समारोपात न्यायालयात जनजागृती मोहीमेचा एक भाग म्हणून राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने यांनी जनजागृतीसाठी तयार केलेल्या कायद्याच्या संदर्भातील वेगवेगळ्या विषयांवरिल डॉक्यूमेंटरीचे सादरीकरण उपस्थित विधीज्ञ व पक्षकारांसमोर करण्यात आले. या जनजागृती अभियानादरम्यान सहकार्य केलेल्या प्रशासकीय सेवेतील तहसिलदार, मुख्याधिकारी, राहुरी, देवळाली प्रवरा, पो. नि. राहुरी, गटविकास अधिकारी, बसस्थानक प्रमुख, विधिज्ञ, समांतर विधी स्वयंसेवक, पोलिस पाटील, प्रिंट व ईलेक्ट्राँनिक माध्यमांचे प्रतिनिधी यांचे विशेष सहकार्याबाबत आभार व्यक्त करण्यात आले. अभियानाच्या समोरोप प्रसंगी सह.दिवाणी न्यायाधीश प्र. प्र. देशमाने, वकील संघाचे अध्यक्ष प्रविण भिंगारदे, राहुरी न्यायालयाचे सहा.सरकारी वकील. शिंपी, विशेष सहा. सरकारी वकील आर. के. गागरे, दुसरे विशेष सहा. सरकारी वकील औताडे, वकील संघाचे पदाधिकारी, समांतर विधी स्वयंसेवक, पोलिस पाटील, पक्षकार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वकील बी. आर. आघाव यांनी केले. वकील तुषार भुजाडी यांनी आभार मानले
