Breaking News

फसव्या आमिषाकडे पाठ फिरवावी : नळे

तरुणांनी व्यसनापासून चार हात लांब आणि मुलींनी आपले संरक्षण स्वतःच करण्याइतपत कणखर झाले तर भविष्य तरुण पिढीची वाटच पाहत आहे. आपल्या उज्वल भविष्यासाठी तात्पुरत्या आणि फसव्या आमिषाकडे हिमतीने पाठ फिरवून चांगले संस्कार अंगिकारावेत, असे प्रतिपादन शिवव्याख्यात्या अनिता नळे यांनी केले.

टेम्भी निमगाव येथील निळकंठेश्वर विद्यालयात आयोजित केलेल्या 'शिवचरित्रातून काय शिकावे’ या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात नळे बोलत होत्या.याप्रसंगी अमोल शिंदे, विलास वर्पे, सतीश वर्पे आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नळे म्हणाल्या, की आकर्षण हे तरुणवयातील विदाराक वास्तव असलं तरी, आपल्या फायद्याचं नेमकं काय, हे ओळखण्याची खूप आवशकता आहे. खोट्या स्तुतीला भुलून तरुण व्यसनासारख्या प्रलोभनाकडे लवकर आकर्षित होत असतात. एकदाच मिळालेले जीवन साध्य करायचे असेल तर, व्यसनापासून या पिढीने दूरच राहिले पाहिजे. समाजात आज आपण अनेक घटना बघतो आहोत. सामान्य कुटुंबातील मुली शिकत असल्या तरी, मुलींच्या संरक्षणाचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत, या गोष्टी टाळण्यासाठी शिवचरित्र प्रत्येकाने वाचण्याची आवश्यकता आहे. तरच पुन्हा शिवराज्य निर्माण होईल, असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.