Breaking News

रेल्वेखाली आल्याने दोन तरुण जागीच ठार


जळगाव, दि. 25, नोव्हेंबर - भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारात रेल्वेखाली आल्याने पावरा समाजातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मयत दोघांची ओळख पटविली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणेश भुरा पावरा (30, रा.कि-या, बैजपूर, जि.खरगोन) व सुरपाल उर्फ टक्ल्या अनसिंग पावरा (30, आंबापाणी, ता.यावल) हे सुसरी शिवारात असलेल्या रेल्वे रुळावर दोघे आले असता रेल्वेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

घटनेचे वृत्त कळताच वरणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी व नाईक संदीप बडगे यांनी धाव घेत पंचनामा केला. दोघाही मयतांनी मद्य सेवन केल्याने ही घटना घडली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. वरणगाव पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.