निष्ठावंत उपाशी; आयाराम तुपाशी !
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नावाला शिवसेनेचा विरोध कायम असल्यानं भाजपला अखेर नमतं घ्यावं लागलं. गुजरात विधानसभेची निवडणूक, आगामी हिवाळी अधिवेशन लक्षात घेता भाजप कोणताही धोका पत्करायला तयार नव्हता. शिवसेनेच्या धमक्यांना एकीकडं घाबरत नाही, असं म्हणता म्हणता भाजप शिवसेनेच्या ढाण्या वाघाला चांगलंच घाबरतो, असं चित्रही या निमित्तानं दिसत आहे.
राणे यांची ही शिवसेनेनं एवढी धास्ती का घेतली आहे, हे कळायला मार्ग नाही. त्यातच दिलेला शब्द भाजपला पाळता येत नाही, हे ही विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं दिसलं आहे. केवळ राणे यांच्यापुरतीच भाजपची ही माघार नाही, तर माधव भांडारी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यालाही इतरांच्या सोयीसाठी वारंवार थांबावं लागत आहे, त्यांचा राजकीय बळी दिला जात आहे, हे चित्रही यानिमित्तानं प्रकर्षानं पुढं आलं आहे.
वाल्यांचा वाल्मिकी करण्याच्या प्रयत्नांत रामालाच पुन्हा वनवासाला पाठविण्याची ही नवी चाणक्यनीती तर नाही ना, अशी शंका आता यायला लागली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड किंवा अन्य ठिकाणी निष्ठावंतांना डावलून आयारामांची सोय लावण्याचे जे प्रकार होत आहेत, त्याचीच पुनरावृत्ती विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं व्हायला लागली आहे.
भाजपमध्ये त्याची नाराजी उमटली नसती, तरच नवल. अर्थात यापूर्वी ही अनेक ठिकाणी अशी नाराजी निष्ठावंतांनी व्यक्त केली होती; परंतु शत प्रतिशत करता करता आपल्या कार्यकर्त्यांचा उद्धार झाला नाही, तरी चालेल, अशी भाजपची वृत्ती दिसते. भाजपनं विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीतून आलेल्या
प्रसाद लाड यांना उमेदवारी दिल्यानं आता भाजपमधूनच नाराजीचे सूर उमटत आहेत.
राणे यांनी काँग्रेससला सोडचिट्ठी दिल्यानंतर, त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळं त्यांच्या रिक्त जागी येत्या सात डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी भाजपकडून पक्षनिष्ठ आणि मुख्य पˆवक्ते माधव भांडारी यांच्या नावाची चर्चा होती. भांडारी हे पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेतच, शिवाय पक्षाची भूमिका अभ्यासपूर्ण आणि ठोसपणे मांडण्याची मुख्य जबाबदारी ते नेटानं बजावतात.
असं असताना लाड यांना भाजपनं विधानपरिषदेची उमेदवारी दिल्यानं, पˆश्न उपस्थित होत आहेत. भांडारी हे भाजपचे स्थापनेपासूनचे कार्यकर्ते आहेत. भांडारींनी भाजपचा कोकण विभाग संघटक, महाराष्ट्र भाजप प्रसिद्धी प्रमुख यांसह अनेक महत्वाच्या संघटनात्मक जबाबदार्या पार पाडल्या आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून बजावलेली कारकीर्द यशस्वी ठरली होती.
महाराष्ट्रात भाजप रुजवण्यात भांडारींचा महत्त्वाचा वाटा आहे. भांडारी हे2006 मध्ये भाजप महाराष्ट्र प्रदेशाचे सहप्रवक्ते म्हणून काम पाहू लागले. त्यानंतर प्रवक्ता आणि मीडिया, सोशल मीडिया या क्षेत्राचे प्रमुख अशाही जबाबदार्या त्यांच्याकडं सोपविण्यात आल्या. भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण संयोजक, भाजपच्या राष्ट्रीय जलसंसाधन सेलचा राष्ट्रीय सेल संयोजक, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या विलासराव साळुंके अध्यासनाचे मानद संचालक म्हणून ते गेली अनेक वर्षे काम पाहत आहेत.
कोकणात जलसंधारण आणि जल-व्यवस्थापनाच्या क्षेत्रात त्यांनी महत्वाची कामगिरी पार पाडली आहे. गेली सात वर्षे महाराष्ट्र प्रदेशाचा मुख्य प्रवक्ता म्हणून ते काम पाहात आहेत. गेल्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या काळात महाराष्ट्र भाजपनं केलेल्या पˆचार मोहिमेचे ते प्रमुख होते. अशा परिस्थितीत भांडारी यांची दावेदारी भक्कम मानली जात होती. मात्र, पक्षानं त्यांना पुन्हा एकदा डावललं आहे.
निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी न देता दोन वषार्पूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या प्रसाद लाड यांना उमेदवारी दिल्यानं निष्ठावंतांना एक प्रकारे अन्यायच केला आहे. राज्यात तसंच देशात गेल्या तीन-साडेतीन वर्षांत राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्या प्रत्येक वेळी भांडारी यांचं नाव चर्चेत असायचं; परंतु प्रत्येक वेळी त्यांना डावललं जायचं. आताही भांडारीच्या नावाला सेनेतून विरोध झाला असं सांगितलं जातं.
शिवसेनेच्या विरोधात वारंवार भूमिका मांडताना शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची खिल्ली उडविण्यात भांडारी कधीही मागं हटले नाहीत. त्यामुळं शिवसेनेनं भांडारीच्या नावाला फुली मारली असण्याची शक्यता आहे. राणे व भांडारी यांना आता जुलैमध्ये रिक्त होणार्या विधान परिषदेच्या जागांसाठी वाट पाहावी लागेल.
या दोघांना आणखी सहा महिने वाट पाहण्यास पक्ष नेतृत्त्वानं सांगितलेलं असू शकतं. भांडारी यांना दोन वर्षापूर्वीपासून विधान परिषदेवर पाठविण्याबाबत चर्चा होती; मात्र पˆत्येक वेळी काहींना काही अडचण तयार झाली आणि त्यांचं नाव मागं पडत गेलं. आता पुन्हा एकदा भांडारीऐवजी लाड यांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेनं त्यांना पाठिंबा दिला आहे.
भाजपची 123, सात अपक्ष व शिवसेनेची 63 अशी 193 मतं युतीकडं आहेत. लाड यांना राष्ट्रवादीतील काहींची मतं मिळतील, असं सांगितलं जातं, तर काँग्रेसची दोन मतं ही लाड यांना मिळतील, असा अंदाज आहे. त्यामुळं तर भाजपनं दोनशे मतांनी आमचा उमेदवार विजयी होईल, असा दावा केला आहे. त्यामागं हे गणित आहे.
भाजपच्या कोषाध्यक्षा व प्रवक्त्या शायना एनसी यांचंही नाव नेहमीप्रमाणं आघाडीवर होतं. शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजप शायना एनसी यांचं नाव पुढं करू शकतं, अशी चर्चा होती. मात्र, खुद्द शायना एनसी यांना विधान परिषदेत नव्हे, तर राज्यसभेत रस आहे. शायना यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. बहुतेक वेळा त्या राष्ट्रीय मुद्यांवर बोलत असतात किंवा पक्षाची बाजू त्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरच मांडताना दिसतात. त्यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
माधव भांडारी यांच्या पदरी मात्र निराशाच आली. लाड हे सध्या त्यांच्यावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते मुंबई बँकेचे संचालक आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वरिष्ठांसोबत लाड यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळंच मुख्यमंत्र्यांनी विधान परिषद निवडणूक जिंकण्यासाठी भांडारीऐवजी लाड यांना पुढं केलं. या सर्व प्रकारात भांडारी यांच्यावर मात्र अन्याय झाला. भाजपची सध्याची नीती निष्ठावंत उपाशी आणि आयाराम तुपाशी अशी आहे.