185 बस पीएमपीएमएलच्या ताब्यात. "त्या" ठेकेदारासोबतचा करार रद्द
पुणे : अचानक संपावर जाऊन प्रवाशांची गैरसोय केल्याबद्दल पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाचे संचालक तुकाराम मुंढे यांनी पसन्न पर्पलसोबतचा करार रद्द केला. परंतु, यामुळे होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्या कंत्राटी पद्धतीवरच्या 200 बसपैकी 185 बस पीएमपीएमएलच्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती ‘पीएमपीएमएल’मधील सूत्रांनी दिली.
थकीत वेतनासाठी कंत्राटी पद्धतीवरचे बस चालक संपावर गेले होते. हा करार ज्या पसन्न पर्पल या कंपनीसोबत करण्यात आला होता, त्यांचा करार यानंतर रद्द करण्यात आला. या कंपनीमार्फत एकूण कोथरूड डेपोमध्ये 101 तर पिंपरी-चिंचवड येथे 99 बस चालविल्या जात होत्या. या कंपनीसोबत करण्यात आलेल्या करारानुसार बस आणि वाहक ‘पीएमपीएमएल’चे होते तर चालक आणि मेंटेनन्स ठेकेदार कंपनीचे होते. यातील 185 गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या असून यातील 135 प्रवाशांच्या सेवेसाठी उतरल्या आहेत. उर्वरित बस दुरूस्तीनंतर लवकरच रस्त्यावर उतरवल्या जाणार आहेत.