Breaking News

गडचिरोली जिल्ह्यातील 1036 गावात नक्षल्यांना गावबंदी

नागपूर, दि. 27, ऑक्टोबर - पोलिस, प्रशासन व राज्यसरकारच्या सकारात्मक प्रयत्नांना अधोरेखित करणारी बातमी आहे. गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियाना जनतेचे  समर्थन मिळत असून आतापर्यंत जिल्ह्यातील 1036 गावांनी नक्षल्यांना गावबंदी केली आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांनी हिंसेला नकार दिला असून विकासाची कास धरल्याचे चित्र  आहे.
गडचिरोलीत 1980 पासून सुरू असलेल्या नक्षली कारवायांमुळे जिल्ह्यातील विकासकामांच्या गती मंदावली आहे. दुष्काळाच्या परिस्थितीतही नक्षलवादी सामान्य नागरीकांना शस्त्राचा  धाक दाखवून शासकीय विकास कामांना विरोध करण्यास भाग पाडत होते. यावर उपाय म्हणून 2003 पासून शासनाकडून नक्षल गावबंदी योजना सुरू करण्यात आली. ही योजना  अंमलात आल्यामुळे नक्षलवाद्यांकडून विविधगावांमध्ये होणा-या नुकसानीच्या घटनांची माहिती शासनाला प्राप्त झाली. तसेच नक्षलवाद्यांच्या नकारात्मक भुमिकेमुळे जिल्ह्यातील विविध  गावांच्या विकास कामात होणारा अडथळा, वारंवार नक्षलबंद ठेवणे आणि विकास कामे होऊ न देण्यासाठी जनतेला दाखविण्यात येणारा धाक इत्यादी प्रकारांना कंटाळून सन 2003  मध्ये कोरची तालुक्यातील 30 गावातील नागरीकांनी एकत्र येऊन नक्षल गावबंदी ठराव मंजुर केला होता. त्यात नक्षलवाद्यांना गावात येऊ देणार नाही, त्यांना कोणत्याही प्रकारची  मदत करणार नाही, नक्षल सभेत जाणार नाही, गावातील मुलामुलींना दलममध्ये जाऊ देणार नाही, गावात नक्षल संघटना स्थापन होऊ देणार नाही, शासनाच्या प्रत्येक विकास क ामात सर्व गावकरी मदत करणार, नक्षलवाद्यांच्या हिंसक कृत्यांना संघटीतपणे प्रतिकार करणार या ठरावांचासमावेश आहे.