Breaking News

वांद्रे रेल्वे स्थानकानजीकच्या झोपडपट्टीला लागलेली आग आटोक्यात

मुंबई, दि. 27, ऑक्टोबर - वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील झोपडपट्टीत सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीवर अडीच तासाच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवण्यात आले. सध्या  घटनास्थळी अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. आगीबाबत माहिती मिळताच 16 अग्निशमन दलाच्या गाड्या आणि 10 वॉटर टॅन्कर घटनास्थळी दाखल झाले होते.  आग लागलेल्या परिसरातील गल्ल्या अतिशय अरुंद असल्याने आग विझवण्यासाठी जवानांना अथक प्रयत्न करावे लागले. यात अग्निशमन दलाचे जवान अरविंद घाटगे हे जखमी  झाले असून त्यांना उपचारांसाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र या आगीत किती नुकसान झाले याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, असे अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी प्रभात रहांगदले  यांनी सांगितले.
अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने येथील नागरिकांना किमान 24 तास आधी नोटीस द्यायला हवी होती. कारवाईला करणे चुकीचे आहे असे नाही. मात्र त्यांना नोटीस  देवून कारवाई करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक हाजी अलीम यांनी दिली.
आगीचे प्रमाण जास्त असल्याने वांद्रे स्कायवॉक आणि त्याखालील वाहतूक बंद करण्यात आली होती. तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली होती. आग एवढी  भीषण होती की झोपडपट्टी तसेच वांद्रे स्थानक परिसरात काळ्या धुराचे ढग जमा झाले होते.