Breaking News

कोपर्डीप्रकरणी तीनही आरोपी दोषी बलात्कार व हत्येप्रकरणी बुधवारी सुनावणार शिक्षा

अहमदनगर/प्रतिनिधी 19 - संपूर्ण राज्याला हादरवून टाकणार्‍या कोपर्डी बलात्कार व खून प्रकरणी जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे व संतोष भवाल या तीन ही आरोपीवरील दोष सिध्द झाल्याने अहमदनगर च्या जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी आरोपींना शनिवारी दोषी ठरवले. 21 नोव्हेंबर ला शिक्षेबाबत सुनावणी होणार असून, ती 22 ला संपणार आहे. त्यामुळे 22 नोव्हेंबर अर्थात बुधवारी आरोंपीना शिक्षा सुनावणार आहे.


कोपर्डी प्रकरणी आरोपी दोषी असल्याचे न्यायालयाने जाहीर केल्यानंतर कोपर्डी गावात समाधान व्यक्त करण्यात आले. आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती आरोपींन शिक्षा काय दिली जाणार याची. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अतिशय प्रभावीपणे बाजू मांडली. विशेष म्हणजे या घटनेत कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसूनही निकम यांनी जोरदार युक्तीवाद करून आरोपीं विरूध्द परिस्थितीजन्य पुराव्यांचे आधारे भक्कम पणे बाजू मांडली आहे.

दरम्यान, आरोपींवर ज्या कलमांतर्गत दोष सिद्ध झाले आहेत, त्यानुसार त्यांना कमीत कमी जन्मठेप आणि जास्तीत जास्त फाशीची शिक्षा होऊ शकते. कलम 120 ए, 376 (बलात्कार) आणि 302 (हत्या) अशा कलमांन्वये लावलेले आरोप सिद्ध झाले आहेत. सुरुवातीला न्यायाधीशांनी आरोपींना कठड्यात उभे केले. तीनही आरोपींना नाव विचारुन, त्यांचे वय विचारले. मग न्यायालयाने तिघांवर ठेवण्यात आलेले आरोप त्यांना वाचून दाखवले. तिघांवर बलात्कार, कटकारस्थान आणि हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सलग तीन दिवस अंतिम युक्तिवाद केला. जिल्हा सत्र न्यायालयात शनिवारी आणि रविवारी सुट्टी असूनही खटल्याचे कामकाज पार पडले.
युक्तिवादात निकम यांनी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमेने कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्या केल्याचा युक्तिवाद केला. यावेळी 24 परिस्थितीजन्य पुरावे सादर केले. घटनेपूर्वी दोन दिवस आधी तिघां आरोपींना छेडून काम दाखवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पिडीतेवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्या केल्याचा युक्तिवाद केला. त्याचबरोबर बचाव पक्षाच्या साक्षीदाराचे व्हिडीओ सीडी बनावट असल्याचा युक्तिवाद केला. तर आरोपींच्या वकिलांनी पंचनाम्यातील त्रुटी, साक्षीदारांचा विसंगतपणा, पुरावे आणि नकाशावर आक्षेप घेतला. अंतिम युक्तिवादाचा ऑडिओ रेकॉर्डिंग ही करण्यात आले आहे.
दरम्यान कोपर्डीच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरातून नागरिक येण्याची शक्यता असल्यामुळे शनिवारी न्यायालयाच्या परिसरात अधिकार्‍यांसह तब्बल 500 पोलिसाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर शिघ्र कृती दल, एफआरपीसह अनेक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोर्टाच्या परिसरात ध्वनिक्षेपक लावण्यात आले होते. तसेच न्यायालयात फक्त न्यायालयीन कामकाजासाठी येणार्‍यांना कडक तपासणी करुनच सोडण्यात येत होते. तर न्यायालयीन कक्षात केवळ खटल्याशी संलग्न असणार्‍यांना प्रवेश देण्यात येत होता.
परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सिध्दखटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हता. हा खटला संपूर्णत: परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता. हे परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सिद्ध करुन दाखवले. मनुष्य खोटं बोलू शकतो, परिस्थिती खोटं बोलू शकत नाही, याचा प्रत्यय खटल्यात आल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी दिली. आरोपी क्रमांक एकचा रक्तग्रुप ‘ओ’ होता, तर मुलीचा रक्तग्रुप ‘ए’ होता. आरोपीच्या कपड्यांवर जे रक्त मिळले, त्यावरील रक्तग्रुप ‘ए’ होता आणि आरोपी हे सिद्ध करु शकला नाही. तसेच या घटनेपूर्वी आणि घटनेनंतर आरोपी 2 आणि 3 त्यांचे कृत्य काय होते, याचा पुरावा आम्ही कोर्टात दिला आणि न्यायालयाने हा पुरावा ग्राह्य धरला, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
31 जणांच्या साक्षकोपर्डी खटल्यात आतापर्यंत 31 जणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात सर्व साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या आहेत. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्यावर कटकारस्थान करुन बलात्कार आणि हत्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.