Breaking News

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध?

विधान परिषदेच्या जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झाल्यानंतर आता ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातच संभाव्य मतफुटीमुळे गुजरातच्या निवडणुकीवर होणाऱ्या परिणामाने काँग्रेसचे नेतेही धास्तावल्याचे कळते.


येत्या ७ डिसेंबरला या जागेसाठी मतदान होणार असून त्यासाठी भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे दिलीप माने यांच्यात लढत होत आहे. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येऊ शकते. विधानसभेतल्या सदस्यांकडून याकरिता मतदान केले जाणार आहे. भाजपाचे १२२ सदस्य असून आणखी १५ सदस्यांचे त्यांना पाठबळ आहे. शिवसेनेचे ६३ सदस्य असून त्यांनीही भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे लाड यांच्या पारड्यात तब्बल २०० सदस्यांची मते आहेत.

याउलट काँग्रेसकडे ४२ तर राष्ट्रवादीकडे ४१ सदस्य आहेत. आणखी जवळ जवळ २० सदस्यांचा पाठिंबा काँग्रेसला मिळेल. त्यामुळे काँग्रेसच्या माने यांच्या पारड्यात सुमारे १०३ मते आहेत. राष्ट्रवादीचे दोन सदस्य कारागृहात आहेत तर काँग्रेसचे नीतेश राणे यांच्यासह किमान दोन सदस्य भाजपाच्या उमेदवाराला मत देतील.