Breaking News

नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा विसर !


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मंगळवारी सलग ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. 'मोदींचा निवडणूक प्रचार हा त्यांचा भूतकाळ तथा गुजरात व गुजरातींच्या कथित उपेक्षेवर केंद्रित आहे. आपण भारताचे पंतप्रधान आहोत, याचा त्यांना विसर पडला आहे. गुजरात निवडणूक मोदी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीवर आधारित नसून, रालोआ सरकारच्या ४२ महिन्यांत न आलेल्या 'अच्छे दिन'च्या फसव्या आश्वासनावर आधारित आहे,' असे चिदंबरम म्हणाले. 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपा व विरोधी बाकावरील काँग्रेसमधील शाब्दिक द्वंद्व अधिकच उग्र होत चालले आहे. काँग्रेसने मंगळवारी गुजरात निवडणूक मोदी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीवर आधारित नसल्याचे स्पष्ट करत मोदींनी जनतेला दिलेल्या 'अच्छे दिन'च्या फसव्या आश्वासनावर केंद्रित असल्याचा दावा केला आहे. मोदींना आपल्या पंतप्रधानपदाचा विसर पडल्याचा आरोपही काँग्रेसने याविषयी रालोआ सरकारवर निशाणा साधताना केला आहे.

'पंतप्रधान बेरोजगारी, गुंतवणुकीतील तूट, लघु व मध्यम उपक्रमांचा नाश, स्थिर निर्यात व महागाईसारख्या ज्वलंत मुद्यांवर एक शब्दही बोलत नाहीत. कारण त्यांच्याकडे या कटू सत्याविषयी कोणतेही उत्तर नाही. त्यांना महात्मा गांधी एक भारतीय व गुजरातचे सुपुत्र होते, याचाही विसर पडला आहे,' असे ते म्हणाले. दरम्यान, मोदींनी सोमवारी विरोधकांना देशातील गोरगरीब जनतेच्या आशा-आकांक्षांची माहिती नसल्याचा आरोप करत काँग्रेसवर सडकून टीका केली होती. गुजरात निवडणूक विकासावरील विश्वास व घराणेशाहीतील द्वंद्व असल्याचेही ते म्हणाले होते..