Breaking News

शेतकरी आत्महत्या देशासाठी लज्जास्पद- व्यंकय्या नायडू

नागपूर, दि. 11, नोव्हेंबर - स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी कृषीला केंद्रस्थानी ठेऊन धोरणांची आखणी केली नाही. त्यामुळेच आज, देशात शेतकरी आत्महत्या होत आहेत. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशासाठी हे अतिशय लज्जास्पद असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. ते आज, शुक्रवारी 10 नोव्हेंबर रोजी नागपुरात आयोजित अ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
नागपुरातील रेशिमबाग मैदानात आयोजित या कृषी प्रदर्शनाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नायडू म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यानंतर गेल्या 70 वर्षात जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी देशावर राज्य केले परंतु, शेतकर्‍यांची अवस्था कायम बिकटच राहिला आहे. आपण स्वत: शेतकरी असल्याने शेती आणि शेतकर्‍यांपुढे असलेल्या समस्यांची चांगलीच जाण आहे. राज्यकर्ते, राजकीय पक्ष तसेच समाजातील विविघ घटकांनी स्वातंत्र्यानंतर कृषीवर हवे तसे लक्ष केंद्रीतच केले नाही. शेतक-यांवर विविध बंधने आहेत. ती हटविणे आवश्यक आहे. सर्व पातळीतून शेतक-यांच्या विकासासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. अन्यथा शेतक-यांची मुले शेतीपासून दूर होतील. शेतकर्‍यांमधीलल नकारात्मक भावना दूर करण्याची आवश्यकता आहे. देशातील 52 टक्के रोजगार हे कृषीवर आधारित आहे. त्यामुळे केंद्र शासनानेदेखील कृषीक्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढविली पाहिजे, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले. यावेळी व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विदर्भातील गोसीखुर्द सिंचन प्रकल्पांतर्गत येणा-या नेरला उपसा सिंचन योजना व उजव्या कालव्याचे ई-भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2014 च्या आधी देशाचा कृषी विकास दर उणे होता. मात्र, आम्ही सत्ते आल्यानंतर सिंचनाला प्राधान्य दिले. विविध प्रयत्नांमुळे कृषी विकास दर 12.5 टक्क्यांवर पोहोचला. शेतक-यांना आता अ‍ॅग्रो सोलर फीडर योजनेमुळे 365 दिवस वीज उपलब्ध होऊ शकणार आहे. वातावरणातील बदल लक्षात घेता शाश्‍वत शेतीवर भर देण्याची आवश्यकता आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.