अनिकेत कोथळे हत्या : युवराज कामटेसह सहा जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
सांगली, दि. 24, नोव्हेंबर - अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी अटकेत असलेला सांगली शहर पोलिस ठाण्याचा बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह त्याच्या सहा पोलिस साथीदार आरोपींची येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती पी. पी. खापे यांनी गुरूवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
आज या सर्व आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मोठ्या पोलिस बंदोबस्तात येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांची कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली.
युवराज कामटे याच्यासह पोलिस हवालदार अनिल लाड, अरूण टोणे, नसरूद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी केलेल्या अमानुष मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाला होता. मात्र या सर्वांनी पोलिस वाहनाचा चालक राहूल शिंगटे याच्या मदतीने अनिकेत कोथळे व त्याचा साथीदार पोलिस ठाण्यातून पळून केल्याचा बनाव केला होता व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अनिकेत कोथळे याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला होता.
याप्रकरणी या सर्वही सहा आरोपींना दि. 9 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडून सुरू आहे. त्यावेळी न्यायालयाने या सर्वांना प्रथम 12 दिवस व नंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली होती.
आज या सर्वांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे मोठ्या बंदोबस्तात त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालय परिसरातही सुमारे 100 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. तत्पूर्वी या सर्वांची येथील वसंतदादा पाटील शासकीय रू ग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.