Breaking News

रूग्णसेवा हीच खरी ईश्‍वरसेवा - अण्णा हजारे

अहमदनगर, दि. 10, नोव्हेबर - राज्य शासनाने राळेगणसिद्धी येथे ग्रामीण आरोग्य शिबीराचे आयोजन केले असून ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना आरोग्य सेवेतून हातभार  देण्याचा शासनाचा प्रयत्न महत्वाचा आहे.राळेगणसिद्धी येथे येत्या 19 नोव्हेंबर रोजी होणार्‍या ग्रामिण आरोग्य शिबीरामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर तपासणीसाठी येणार असल्याने  गरजू रूग्णांना लाभ देण्यासाठी प्रत्येकाने सेवा समजून हे काम करणे आवश्यक आहे.सेवेतूनच खरा आनंद मिळतो.त्यामुळे रूग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा समजून प्रत्येकाने सहभाग नों दवावा असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी आज येथे केले.
राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ग्रामीण आरोग्य शिबीराचे येत्या 19 नोव्हेंबर सकाळी 09.00  वाजता आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त आयोजित आढावा बैठकीत अण्णासाहेब बोलत होते.
अण्णा हजारे म्हणाले की,रूग्णसेवा हीच ईश्‍वर सेवा असल्याने प्रत्येकाने सेवा समजून या आरोग्य शिबीरात सहभागी व्हावे.बैठकीदरम्यान शिबीराच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात  आली. आरोग्यदूत रामेश्‍वर नाईक म्हणाले, वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या पुढाकारातून वैद्यकिय शिक्षण विभाग,आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन तसेच राळेगणसिद्धी प रिवार यांच्या समन्वयाने सदर आरोग्य शिबीराचे नियोजन करण्यात येत आहे.जिल्ह्यातील सर्व शासकिय रूग्णालयात 13 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर दरम्यान आरोग्य पुर्व तपासणी सप्ताह  घेण्यात येणार असून गरजू व गरीब रूग्णांनी मोठ्या संख्येने आपली पुर्वतपासणी आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात विनामुल्य करून नोंदणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्यदूत  रामेश्‍वर नाईक यांनी केले.या शिबीरासाठी मुंबई,पुणे,नाशिक येथील विख्यात डॉक्टरांमार्फत विनामुल्य रूग्ण तपासणी केली जाणार असून शिबीरा दरम्यान  नेत्ररोग,ह्रदयरोग,अस्थिरोग,बालरोग,मुत्ररोग,स्त्रीरोग,नाक,कान,घसा,श्‍वसन विकार,कर्करोग,मेंदू रोग,दंतरोग आदी महत्वाच्या आजारांवर मोफत उपचार पुरविले जाणार आहेत असे  वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी संदिप जाधव यांनी सांगितले. यावेळी केंद्र सरकारचा संत ईश्‍वरदास सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल रामेश्‍वर नाईक यांचा  अण्णांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.