Breaking News

आगीतून लेकीला वाचविण्यासाठी धडपड करणारे वडील अत्यावस्थेत

ठाणे, दि. 10, नोव्हेबर - ठाण्यामधील राधाबाई चाळीमध्ये दगडू जाधव यांच्या घराला लागलेल्या आगीतून लेकीला बाहेर काढतांना जखमी झालेले जाधव मृत्यूंशी झुंज देत  असल्याची घटना ठाण्यात घडली आहे. राधाबाई चाळीत राहणारे दगडू जाधव यांच्या घरात गॅसगळतीमुळे स्फोट झाला. या आगीमधून संपूर्ण कुटुंब बाहेर निघाले मात्र जाधव यांची  मुलगी प्रिती घरातच कपाटाखाली अडकली होती. तिला वाचविण्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता दगडू यांनी आगीच्या दिशेने झेप घेतली. झालेल्या दुर्घटनेत मुलीच्या  बचावासाठी धावलेले वडील सिव्हिल रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून जाधव कुटुंबातील चौघांवरही उपचार सुरु आहेत.
राधाबाई चाळीतील राहणारे दगडू जाधव यांची पत्नी दर्शना जाधव यांनी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरातील दिव्याचे बटण सुरू केले आणि काही काळातच गॅसचा स्फोट झाला. या  स्फोटात दर्शना जाधव भाजल्या गेल्या. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतानाच त्यांचे पती दगडू जाधव (65) आणि मुली दीप्ती (26) आणि प्रिती यांच्याही शरीरावर असंख्य जखमा  झाल्या. आईसह दीप्ती यांना घराबाहेर पडण्यात यश आले तर त्यापाठोपाठ दगडू यांनाही शेजार्‍यांच्या मदतीने बाहेर पडण्यास वाट मिळाली. मात्र, प्रिती घरामध्ये अडकल्याचे लक्षात  आल्याने वडील दगडू यांनी पुन्हा एकदा घरात प्रवेश केला आणि मुलीपर्यंत पोहोचले. या आगीत ते दोघेही होरपळून निघाल्याने त्यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल केले, त्यांच्यावर  उपचार सुरू असून आगीशी दीर्घकाळ सामना केल्याने जाधव हे साठ टक्के भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. वडिलांची प्रकृती गंभीर असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत.