Breaking News

गुजरातमध्ये सत्ता व पैसा यांचा प्रचंड वापर - शरद पवार

मुंबई, दि. 10, नोव्हेबर - गुजरात निवडणुकांत काय परिणाम येतील यावर भाष्य आताच करता येणार नाही. परंतु तेथे सत्ता व पैसा यांचा प्रचंड वापर होत आहे, असा आरोप राष्ट ्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केला. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा आलेख आता पूर्वीसारखा राहिलेला नाही.
टीव्ही जर्नालिस्ट असोशिएशनच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिल्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.  गुजरातमध्ये आमचे दोनच विधानसभा सदस्य आहेत. तेथे निवडणुका लढवित आहोत. आम्ही काँग्रेससोबत प्राथमिक चर्चा केली आहे. भाजपसोबत मात्र आपला पक्ष गुजरात किंवा  अन्यत्र काय कधीही जाणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
केंद्र व राज्यातील सरकारला पवार यांनी यावेळी लक्ष्य केले. मेट्रोला आपला विरोध नाही, मात्र पर्यावरणाचा विचार व्हायलाच हवा. समृद्धी महामार्गासाठी जमिनी घेण्याची पद्धती  अमानूष आहे. शेतक-यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, यासाठी दक्ष रहाणा-या एका शेतक-याला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचे प्रकरण आपल्याकडे आले आहे. या  अमानूषपणाबद्दल राज्यातील सर्व शेतक-यांना सोबत घेऊन वेळ पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समविचारी पक्षांसोबत रस्त्यावर उतरेल. नोटाबंदीचे परिणाम कामगार कपात होण्यात  होत आहे. आधी महामंदी होती त्यात नोटाबंदी आली. पंतप्रधान परदेशातील काळा पैसा देशात प्रत्येकाच्या खात्यावर भरणार होते. पण आता सक्तवसुली संचालनालय व आयकर  विभाग हे लोकांना त्रास देत आहेत. त्याचीही आम्ही दखल घेतली आहे. शेतक-यांबाबत हे सरकार गंभीर नाही. डॉ. स्वामिनाथन समितीच्या शिफारसी लागू करा, अशी मागणी क रणारेच आता सत्तेवर आल्यावर त्या लागू करू शकत नाही, असेही पवार म्हणाले.
महिला व मुलींवर वाढणा-या अत्याचारांबाबतच्या प्रश्‍नाच्या उत्तरात पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांना खंडणीसाठी आलेल्या धमकीचा उल्लेख केला. आपण  याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे तसेच ठाणे पोलीस आयुक्तांशीही बोललो आहोत. ज्या राज्यात जागरूक लोकप्रतिनिधीच सुरक्षित नाही तेथे महिला व मुलींची सुरक्षा काय  असणार ? हे काय कायद्याचे राज्य आहे का ? जाहिराती मात्र तशा सुरू आहेत. हे राज्य कोठे चालले आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला.