महाजनो येन गतः स पन्थाः
श्रुतिर्विभिन्ना स्मृतयश्च भिन्ना नैको मुनिर्यस्य वचः प्रमाण।धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनो येन गतः स पन्थाः॥ असं एक सुभाषित आहे. त्याचा अर्थ श्रुती वेगळेवेगळे सांगत आहेत, स्मृतीही वेगळेवेगळे सांगत आहेत. असा एकही मुनी नाही, की ज्याची शिकवण सर्वमान्य आहे. धर्माचं गूढ गुहेत लपल्यासारखं आहे. अशा स्थितीत आदरणीय व्यक्ती ज्या मार्गानं गेल्या, तो मार्ग चोखाळावा असा आहे.
जेव्हा संभ्रम निर्माण होतो, उपाय सापडत नाहीत, काय करावं, असा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा मोठ्या व्यक्तींनी सांगितलेला मार्गच अनुसरावा, असं या श्लोकांत म्हटलं आहे. आपल्या राज्याचे आदरणीय मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचं नाव तर संस्कृत श्लोकाच्या अग्रभागी असल्यामुळं जेव्हा जेव्हा जनता अडचणीत येते, तेव्हा तेव्हा त्यांनी दाखविलेला मार्गच उपयुक्त असतो; परंतु तेवढं भान आपल्या विरोधकांना आणि महाजन यांच्या पक्षातल्या अंतर्गत विरोधकांना कुठून येणार?
गिरीश महाजन यांनी विद्यापीठ पातळीवरील क्रीडा स्पर्धा गाजविलेल्या आहेत. त्यांचं शरीर खास कमावलेलं आहे. खरं तर त्यांना राज्य सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेचीही गरज नाही. त्याचं कारण त्यांच्या कंबरेला सातत्यानं पिस्तुल असतं. एवढा जागरूक लोकप्रतिनिधी दुसरा कुणी असू शकेल? मुलांसमोर भाषण करताना गिरीशभाऊंच्या कंबरेला पिस्तुल होतं.
खरं तर त्यातून मुलांनी आपलं सरंक्षण करण्यास आपणच कसं समर्थ असलं पाहिजे, असा धडा गिरीशभाऊंना द्यायचा होता; परंतु झालं भलतंच. माध्यमं आणि विरोधक गिरीशभाऊंच्या मागं हात धुवून लागली आहेत. त्यांच्या या भाषणाचा केवढा गवगवा माध्यमांनी आणि विरोधकांनी करावा. काय तर म्हणे मुलांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होईल. मुलं आता मोबाईल, समाजमाध्यमांतून इतकी पुढं गेली आहेत, की त्यांच्यादृष्टीनं पिस्तुल हे आता हातातलं एक खेळणं झालं आहे; परंतु हे गिरीशभाऊंच्या विरोधकांना कसं समजणार?
लोकांच्या अडीअडचणीत धावून जातो, तोच खरा लोकप्रतिनिधी असतो. आताही ते चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे परिसरात बिबटयाला ठार मारण्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसताना पिस्तूल हातात घेऊन धावले. खरं तर त्याचा अभिमान बाळगायला हवा होता. त्यांच्या जिल्ह्यातील लोकांच्या मरणाला कारणीभूत ठरणारा नरभक्षक वाघ गिरीशभाऊ वरखेडे परिसरात सांत्वनाला गेले असताना दिसल्याची तक्रार नागरिकांनी केली. वनविभागाला कळवा, मग ते येतील, तोपर्यंत नरभक्षक वाघ त्यांची वाट पाहत बसणार आहे का?
टीका करणार्यांना ते कळतच नाही. गिरीशभाऊ लगेच धावले. कोणताही वाघ नरभक्षक नसतो. त्याच्या कार्यक्षेत्रात नागरिकांची ढवळाढवळ झाली, की तो स्वसंरक्षणासाठी हल्ले करतो, हे तत्त्वज्ञान ज्यांच्या घरची माणसं वाघानं मारली, त्यांना सांगून उपयोग होत नसतो. वनविभागाच्या अधिकार्यांना बोलवून पिंजरा लावणं, त्याला बेश्ाुद्ध करण्याचं इंजेक्शन देणं हे उपाय असतात.
वाघांची हत्या करणं हा गुन्हा असला, तरी गिरीशभाऊंच्या जिल्ह्यातील लोकांच्या जीविताशी खेळ म्हणजे साक्षात मृत्यूच हे कुणीतरी त्या वाघाला समजावून सांगायला हवं. कायदा महत्त्वाचा, की लोकांचे प्राण? त्यातील लोकांच्या प्राणाला महत्त्व देणार्या गिरीशभाऊंचं कौतुक करण्याऐवजी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक हे कावीळ झाल्यासारखी टीका करीत आहेत. राजीनामा मागत आहेत.
लोकांचं सरंक्षण करणं हा गुन्हा कसा होऊ शकतो, हे त्या मलीक यांना कुणीतरी शिकविण्याची गरज आहे. उगुीच असली जीभ म्हणून उठसूठ टाळ्याला लावण्यात काय अर्थ आहे? या परिसरातील बिबटया नरभक्षक असल्यानं वन विभागानं त्याला ठार मारण्याचे आदेश दिल्यानंतरच आपण हे कृत्य केलं, असं त्यांनी सांगितलं आहे. मागील काही महिन्यांत नरभक्षक बिबटयानं चाळीसगावात 5 बळी घेतले आहेत.
गˆामस्थ अडचणीत असताना आणि यापूर्वी नाहक पाच बळी गेलेले असताना मी गाडीत बसून राहू शकत नाही, असं गिरीशभाऊचं म्हणणं लक्षात घेतलं, तर या माणसाचं मोठेपण लक्षात घ्यायला हवं. तसं त्यांच्या नावातही महाजन म्हणजे मोठी माणसं असल्यानं त्यांना इतरांनी दिलेल्या मोठेपणाची गरज नाही म्हणा.
रविवारी वरखेडे परिसरात एका शेतात कापूस वेचत असलेल्या सुसाबाई भील नावाच्या महिलेवर बिबटयानं हल्ला केला. यात सुसाबाईचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळताच गिरीश महाजन वरखेडे गावातील भील कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी गेले होते. मंत्री महोदय व त्यांचा ताफा तिथंच असताना गˆामस्थांनी तिथं बिबट्या आल्याचं सांगितलं. यानंतर महाजन यांनी वन विभागाच्या पथकाला बोलावून बिबट्याच्या मागं पिस्तूल घेऊन धावले.
महाजन स्वतः शेतात गेले व एका झाडाआड लपून बिबट्यावर पिस्तूल रोखलं; मात्र बिबटया निसटून गेला. पिस्तुलातून गोळी लवकर उडाली असती, तर बिबट्याची काही खैर नव्हती. महाजन यांच्या कृत्यानंतर विरोधकांनी त्यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. महाजन यांनी वन विभागाच्या कायद्याचं उल्लंघन केल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. वनविभागाच्या अधिकार्यांसमवेत त्यांनी हे कृत्य केल्यानं कायद्याचं उल्लंघन कसं होईल? तसं असेल, तर वनविभागाच्या अधिकार्यांवरही मग गुन्हा दाखल व्हायला हवा.
मंत्र्यांना चुकीचं कृत्य करण्यापासून रोखलं नाही, म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हायला नको का? एखाद्या बिबटयाला मारण्याचं काम मंत्रीमहोदयांचं असतं का, असाही प्रश्न या निमित्तानं विचारला जाऊ लागला आहे. गिरीश महाजन यांना चमकोगिरी करण्याची पूर्वीपासूनच सवय आहे, असं आता बोललं जाऊ लागलं आहे. गेल्या वर्षी एका शालेय कार्यक्रमात कमरेला पिस्तूल लावूनच त्यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसं वाटली होती.
सहकारी साखर कारखानदारी जगावी, म्हणून त्यांनी शिरपूरला किती मोलाचा सल्ला दिला होता. तेथील देशी दारूचं उत्पादन खपत नाही, अशी खंत कारखान्याच्या अध्यक्षांनी व्यक्त केली, तर गिरीशभाऊंनी लगेच त्यांना या मद्याला महिलांची नावं देण्याचा सल्ला दिला होता! गिरीशभाऊंच्या या कल्पकतेचं कौतुक करण्याऐवजी तेव्हा ही त्यांच्याविरोधात आंदोलन झालं होतं.