शरद पवार-ठाकरे भेटीमुळं भाजपची कोंडी
दि. 09, नोव्हेंबर - भाजपच्या विरोधात देशव्यापी दबावगट स्थापन करता येईल का, याबाबत विचार-विनिमय सुरू आहे. केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात नोटाबंदी, जीएसटी, महागाई, बेरोजगारी आदी कारणांमुळं नाराजी वाढत असताना भाजपच्या मित्रपक्षातील काही पक्ष तसंच भाजपच्या विरोधातील पक्षांनीही एकत्र येण्याची चाचपणी चालविली आहे. गुजरात आणि हिमाचल पदेशच्या निवडणुकीचा पचार एकीकडं जोरात सुरू असताना भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्याच्या पयत्नांना वेग आला आहे. त्याचं केंद्र मुंबई झालं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट मागितली होती, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या दोघांची भेट होऊ शकली नसली, तरी शिवसेनेचे पक्षपमुख उद्धव ठाकरे आणि ममतादीदींची भेट झाली. ही भेट राजकीय नसल्याचं कितीही सांगितलं जात असलं, तरी त्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही.ममतादीदींनी दिल्लीत काढलेल्या भाजपविरोधी मोर्चात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष असलेली शिवसेना सहभागी झाली होती. नोटाबंदी, जीएसटीवर ममतादीदी आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते तुटून पडले. दोघांचं दुःख एकच आहे, ते म्हणजे इतर पक्षांऐवजी भाजप त्यांना आव्हान द्यायला लागला आहे. या पार्श्वभूूमीवर दीड-दोन तास हे दोन्ही नेते शिळोप्याच्या गप्पा मारायला नक्कीच एकत्र आले नसतील. त्याअगोदर पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. आता पवार व उद्धव ठाकरे यांच्यात दहा दिवसांपूर्वी झालेल्या भेटीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या भेटीचं वृत्त दहा दिवसांनी बाहेर येण्यामागं दबावाचाच भाग असावा.
भाजपसोबत सत्तेत राहण्याची उद्धव यांची मानसिकता नसल्याचं जाणवल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं आहे. हे मत जास्त महत्त्वाचं आहे. पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी झालेल्या भेटीच्या वेळी खासदार संजय राऊत हे ही उपस्थित होते. राऊत दिल्लीत सातत्यानं पवार यांच्यासोबत असतात. दोघंही राज्यसभेचे सदस्य आहेत. राऊत यांनीच या भेटीबाबत महत्त्वाची भूमिका पार पाडलेली असावी. बाळासाहेब आणि पवार यांच्यातील मैत्रीचे आणि राजकीय संबंध हा कायम जिव्हाळ्याचा विषय असायचा. आता उद्धव व पवार यांनीही टीका आणि मैत्री अशा दोन्ही पातळ्यांवरची ‘लव्ह हेट रिलेशनशीप’ जपली आहे. पवार आणि ठाकरे यांची भेट गुप्त होती. सुमारे दोन तासांच्या या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थिती व भाजपच्या सत्ता राबविण्याच्या अनेक घटनांवर दोघांत सखोल चर्चा झाली असावी. पवार यांना भेटल्यासंदर्भात ठाकरे यांनी मौन बाळगलं आहे. दहा दिवसांपूर्वी पवार-ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा उघड झाली असताना शिवसेनेनं या विषयावर पूर्णपणे मौन बाळगलं आहे. पवार यांच्या विधानाचा अर्थ काढला, तर शिवसेना सरकारमध्ये राहायला तयार नाही, असा होतो. शिवसेनेनं सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तर पवार यांच्या राष्ट्रवादी काँगेसनं भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ नये, यासाठी ही भेट होती, असा त्याचा त्याचा दुसरा अर्थ निघतो. पवार यांनी यापूर्वी आणि उद्धव यांच्या भेटीनंतरही राष्ट्रवादी कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा देणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. पवार यांनी काँगेसबरोबरची आघाडी कायम ठेवण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. या गोष्टीतून राष्ट्रवादी व शिवसेनेनं भाजपवर दबाव कायम ठेवल्याचं दिसतं. भाजपनं मंत्रिमंडळ विस्तारात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मंत्रिमंडळात सामील करून घेण्याचं जाहीर केलं आहे. शिवसेनेचा राणे यांना मंत्रिमंडळात घ्यायला विरोध आहे. राणे यांना मंत्रिमंडळात घेतले, तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा शिवसेनेनं यापूर्वीच दिला होता; परंतु शिवसेनेच्या दबावाला भाजप कोणतीच भीक घालीत नाही. राणे यांनी आपला मंत्रिमंडळ पवेश कोणीच रोखू शकत नाही, अशी गर्जना यापूर्वीच केली आहे. राणेंना मंत्री बनवण्यावर भाजप ठाम राहिला, तर पुढं काय करायचं, हा शिवसेनेसमोरचा पश्न आहे. या अस्वस्थतेतून उद्धव यांनी पवार यांची भेट घेतली असावी. शिवसेनेनं पाठिंबा काढला, तर राष्ट्रवादीनं भाजपचं सरकार वाचवू नये, असं साकडं उद्धव यांनी पवारांना घातलं असावं. त्यामुळं शिवसेना सत्तेतून बाहेर पडली, तरी राष्ट्रवादी कोणालाही पाठिंबा देणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत पवारांनी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता सध्यातरी फेटाळून लावली आहे. पवारांच्या बोलण्यातून त्यांनी सध्यातरी कोणासोबतच जाणार नसल्याचं म्हटलं आहे; परंतु 2014 मध्ये याच पवारांनी शिवसेनेचं सत्तास्थापनेतील ‘बार्गेनिंग पॉवर’ कमी करण्यासाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. कदाचित म्हणूनच राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ समावेशावरून अस्वस्थ असलेल्या ठाकरे यांनी पवार पुन्हा भाजपला पाठिंबा तर देणार नाहीत ना, याची चाचपणी केली असावी. या दोन पक्षपमुखांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे गुलदस्त्यात असलं, तरी शिवसेनेच्या सावध भूमिकेवरून पवार यांनी उद्धव यांना कोणतंही ठोस आश्वासन दिलं नसावं. राणे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, यासाठी भाजपवर राजकीय दबाव वाढवण्यासाठीच उद्धव आणि पवारांनी त्यांच्या गुप्त बैठकीची जाणिवपूर्वक उघड राजकीय चर्चा घडवून आणली असावी. राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असताना एकहाती सत्ता राबविणार्या भाजपला घेरण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधली जात असल्याचं सूचित होत आहे. ठाकरे व पवार यांचे संबध पूर्वीपासूनचे आहेत. तरीही राज्यातील भाजप सरकार विरोधात नाराजी व्यक्त करण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली असावी. शिवसेना सत्तेत राहूनही भाजपविरोधात आंदोलन करत आहे. ते भाजपला सहन होत नाही. त्यामुळं भाजप आणि शिवसेनेतील दुरावा वाढत आहे. त्यामुळं उद्धव-पवार यांच्या भेटीला महत्व आलं आले. ममता बॅनर्जी यांच्यापाठोपाठ पवार यांचीही उद्धव यांनी भेट घेऊन भाजपला कोंडीत पकडलं आहे.