Breaking News

तरुणाने विवाहितेवर वर्षभर अत्याचार करुन उकळले साडेतीन लाख रुपये

पुणे, दि. 11, नोव्हेंबर - पानातून गुंगीचे औषध देऊन एका 23 वर्षीय विवाहितेवर 19 वर्षांच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना चाकण येथे उघडकीस आली. दरम्यान, तरुणाने घटनेचे चित्रीकरण करून विवाहितेवर वर्षभर अत्याचार केले. तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन त्याने साडेतीन लाख रुपयेही उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडितेने शालमोन ऊर्फ विकी प्रदीप शिंदे (रा. चाकण, पुणे) याच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी शालमोन विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिला मूळ नगर जिल्ह्यातील अकोले येथील रहिवासी असून सध्या पती दोन मुलांसोबत चाकण येथे राहते. डिसेंबर 2016 मध्ये मोबाइल रिचार्ज करण्यासाठी ती एका मोबाइलच्या दुकानात गेली होती. या वेळी तिने दुकानदारास मोबाइल क्रमांक दिला असता तिथे असलेल्या विकीने तो नंबर ऐकून नोंद करून घेतला. त्यानंतर त्याने संबंधित महिलेशी संपर्क साधत तिला माझ्यासोबत मैत्री कर असे सांगत वारंवार तिच्याशी फोन मेसेजद्वारे संपर्क साधला.
महिलेने त्याला प्रतिसाद दिल्याने एक दिवस महिला घरी एकटीच असताना तो थेट तिच्या घरी आला. त्याने तिला पानातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केले. तसेच या घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरणही केले. त्यानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन साडेतीन लाख रुपये उकळले. दरम्यान, घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.