तापसरीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक सिंधुदुर्गमध्ये
सिंधुदुर्गनगरी, दि. 24, नोव्हेंबर - सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वाढत्या तापसरी आणि लेप्टोची शासनस्तरावरुन गंभीर दखल घेण्यात आली आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. धारूळकर यांनी आज सकाळी जिल्ह्यात तातडीने दाखल होत जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. लेप्टो आणि तापसरीची साथ नियंत्रणात येईपर्यंत 10 तज्ञ डॉक्टर्स आणि लैब टेक्नीशियन देण्यात येतील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील वाढत्या तापसरी आणि लेप्टो स्पायरोसिसच्या साथीची शासनस्तरावरुन गंभीर दखल घेण्यात आली आहे. आज तातडीने आरोग्य उपसंचालक ड़ॉ. धारुळकर जिल्ह्यात दाखल झाले आणि त्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी ड़ॉ. योगेश साळे यांच्यासोबत बैठक घेत त्यांनी तापसरी संदर्भात संपूर्ण आढावा घेतला.
तापसरीवर नियंत्रणासाठी सर्वतोपरी उपाय योजनेच्या सक्त सूचना त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान आरोग्य उपसंचालक ड़ॉ. धारूळकर स्वतः लेप्टोबाधित गावांमध्ये जाऊन भेट देणार असल्याची आणि 10 डॉक्टर्स तसेच लैब टेक्निशिअनची टीम साथ नियत्रणासाठी जिल्ह्यात तैनात राहणार असल्याची माहीती ड़ॉ. धारूळकर यानी यावेळी दिली. येत्या 8-10 दिवसात तापसरीची साथ आटोक्यात येईल असा विश्वाससुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला.