Breaking News

दुचाकी अपघातात तरूणाचा मृत्यू

औरंगाबाद, दि. 24, नोव्हेंबर - हॉटेलमध्ये मित्रांसोबत जेवण करून घराकडे जात असताना दुचाकीचा अपघात होऊन गजानन प्रल्हाद जाधव (30, रा.वडगाव कोल्हाटी, वाळूज महानगर) यांचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई महामार्गावरील साजापूर फाट्यावर घडली. गजानन जेवण करण्यासाठी साजापूर येथे मित्रांसोबत गेले होते. हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर त्यांच्या (एमएच 20 3480) दुचाकीवरून ते घराकडे येत असताना, मुंबई हायवेवरील साजापूर फाट्याजवळ दुचाकीचा अपघात झाला. 


अपघातानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्या मध्ये पडले. हे पाहून गावक-यांनी 108 रुग्णवाहिकेला घटनेची माहिती दिली. रुग्णवाहिकेतून त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. गजानन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गजाननच्या दुचाकीला वाहनाने धडक दिली, की दुचाकीवरुन तोल जाऊन अपघात झाला.

याबाबत त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांची चौकशी केल्यानंतर अपघाताचे खरे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार एस. जे. भागडे करीत आहेत.