Breaking News

उपसरपंच निवडीत सरपंचाच्या मताचा ‘टेकू’ असंभव

बुलडाणा, दि. 10, नोव्हेंबर - लोणार तालुक्यात 39 ग्रामपंच्यायतीच्या निवडणुका पार पडल्या. सरपंच थेट जनतेतून निवडून आले आहेत. आता उपसरपंच पदासाठी 11 नोव्हेंबर  रोजी निवडणूक होणार आहे. तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीत सरपंच एका पक्षाचे आणि ग्रामपंचायतीत बहुमत दुसर्‍या पक्षाचे, अशी स्थिती आहे. विरोधकांचे काठावर बहुमत  असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच यांचे मत आणि निर्णायक मत उपसरपंच निवडणुकीत कलाटणी देऊ शकत होते. मात्र, सरपंच यांना उपसरपंच निवडणुकीत मताचा अधिकार  नाही. समसमान मते पडली तरच सरपंच यांना निर्णायक मत देण्याचा हक्क आहे. ग्रामविकास मंत्रालायातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्याला स्पष्ट दुजोरा दिला आहे.
गुजरात आणि मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रात प्रथमच थेट जनतेतून सरपंच यांची निवड झाली. त्यासाठी राज्य शासनाने दि. 19 जुलै 2017 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.  त्यानंतर नुकतेच राज्यात दोन टप्प्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. लोणार तालुक्यात 39 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. थेट सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य  पदासाठी निवडणूक पर पडली आहे.
सरपंच, सदस्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेत उपसरपंच यांची निवड घेण्यात येईल, असे शासन अधिसूचनेत म्हटलेले आहे. उपसरपंच यांच्या  निवडणुकीमध्ये समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क असेल आणि सरपंच यांचे पद रिक्त असेल तर त्या निवडणुकीचा निकाल पीठासीन अधिकारी चिट्ठी  टाकून देतील, असा उल्लेख अधिसूचनेत आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच एका पक्षाचे अथवा गटाचे आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये बहुमत दुसर्‍या पक्षाचे अथवा  गटाचे असा प्रकार घडला आहे. 
विरोधकांचे काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीत सरपंच यांच्या मताच्या जोरावर उपसरपंचही आपल्याच गटाचा करण्याचे दावे केले जात आहेत. सरपंच यांच्या मताच्या अधिक ाराबाबत मतमतांतरे, उलटसुलट चर्चा होत आहे. थेट निवडून आलेले सरपंच हे ग्रामपंचायतीचे पदसिध्द सदस्य आहेत. त्यांना उपसरपंच निवडनुकीत मताचा अधिकार असून  समसमान मते पडल्यास दुसरे आणि निर्णायक मत देण्याचाही हक्क आहे, असा युक्तिवाद काहीजनाकडून होत आहे. तर उपसरपंच निवडणुकीत सरपंच यांना मत देण्याचा अधिकार  नाही. समसमान मते पडली तरच सरपंच यांना निर्णायक मत देण्याचा हक्क आहे, असाही युक्तिवाद केला जात आहे. त्यावर ग्रामविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्पष्टीकरण  दिले आहे.
ग्रामपंचायतीत ज्यांचे बहुमत; त्यांचेच होणार उपसरपंच
उपसरपंच निवडणुकीत सरपंच यांना ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सदस्य म्हणून मत देण्याचा अधिकार नाही. ग्रामपंचायत सदस्यांच्या मतदानातून समसमान मते पडली तरच सरपंच यांना  निर्णायक मत देण्याचा हक्क असल्याचे ग्रामविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीत बहुमत नसतांना सरपंचाच्या मताचा आणि निर्णायक मताचा  टेकू घेऊन उपसरपंच निवडणुकीत मारण्याची काहींची मनीचा फोल ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सदस्यांमध्ये ज्यांचे बहुमत त्यांचाच उपसरपंच होईल.