Breaking News

नोटा बंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थनितीला शिस्त आली - खा. विनय सहस्त्रबुद्धे

पुणे, दि. 09, नोव्हेंबर - नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक फायदे झाले. देशाच्या अर्थनितीला कसलीही शिस्त नव्हती. ती शिस्त या निर्णयामुळे आली. डिजीटल व्यवहारांमुळे काळ्या  पैशाच्या वापरावर निर्बंध आले असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आणि खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी नोटाबंदीचे समर्थन केले. 
विमुद्रीकरणाच्या (नोटाबंदी) निर्णयाच्या वर्षपुर्ती निमित्त विरोधी पक्षांनी काळा दिवस पाळला आहे. भाजपाच्या वतीने त्यांच्या विरोधात देशभरात काळा पैसा विरोधी दिन साजरा क रण्यात येत आहे. शहर भाजपाने त्यासाठी आयोजित केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे जोरदार  समर्थन करीत विरोधकांवर टीका केली.
पक्षाचे खजिनदार प्रा. विनायक आंबेकर यांनी लिहिलेल्या नोटाबंदीची वर्षपुर्ती या पुस्तिकेचे प्रकाशन सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा आमचा  विचार नाही.भारतीय जनता पार्टी अर्थकारणात कधीही राजकारण आणत नाही. विमुद्रीकरणाच्या वेळीस सहकारी बँकांनी जमा केलेला पैसा काही काळ गोठवला गेला, मात्र असे का  केले याचा खुलासा माझ्यापेक्षा रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाच जास्त चांगल्या पध्दतीने देऊ शकेल असे ही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर काश्मिरमधील दगडफेक थांबण्यापासून ते बनावट कंपन्या बंद करण्यापर्यंत अनेक गोष्टी झाल्या आहेत. मात्र विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे.  त्याला उत्तर द्यायचे म्हणून भाजपाने देशभर काळा पैसा विरोधी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ भाजपाला माघार घ्यावी लागली असा होत नाही असेही त्यांनी स्पष्ट  केले.
नोटाबंदी, त्यानंतर डिजीटल व्यवहार, रेरा कायदा यासारखे काही निर्णय घेण्याची गरजच होती. सुरूवातीच्या काळात त्याचा त्रास होणार हे दिसत असतानाही त्यामुळेच निर्णय  घेण्यात आले. हे निर्णय वेगवेगळे पाहिले तर त्याचा एकसंध फायदा काय झाला ते दिसत नाही. मात्र आता तो दिसू लागला आहे. ज्यांना काळ्या पैशात, त्याची निर्मिती होण्यात रस  आहे तेच अपप्रचार करीत आहेत, मात्र जनतेला आता फायदा दिसू लागला आहे असा दावा सहस्त्रबुद्धे यांनी केला.  रोजगार कमी झाला हा अपप्रचार विरोधकांकडून होत आहे.  देशात किती रोजगार निर्माण झाला याची आकडेवारी तयार करणारी कंपनी आहे. त्यांच्या सर्वेक्षणानुसार सर्व क्षेत्रात चांगला रोजगार निर्माण झाला आहे. खोटे उद्योग, करबुडव गिरीसाठी स्थापन केलेल्या कंपन्या बंद झाल्या याचा अर्थ रोजगार बंद झाला असा होत नाही. उलट स्टार्ट अप, मेक इन इंडिया यासारख्या योजनांमुळे उद्योजकतेला चालना मिळून  रोजगारनिर्मिती होत आहे.