Breaking News

विवाहित महिलेला जाळून ठार मारले. : मयत महिलेच्या पित्याची फिर्याद

श्रीगोंदा/प्रतिनिधी/ :- वांगदरी ता. श्रीगोंदा येथील २७ वर्षाची विवाहित महिला वैशाली विकास नागवडे हिला तिचा पती विकास भिकाजी नागवडे, सासरे भिकाजी वामन नागवडे आणि सासू शालन भिकाजी नागवडे यांनी २१ नोव्हेंबर २०१७ च्या रात्री बारा ते साडे बारा वाजता जाळून मारले. सासू व सासरे यांनी तिचे हातपाय पकडले आणि पतीने रॉकेल ओतून तिला पेटवून दिले.



अशी फिर्याद मयत वैशाली हिचे वडील रामदास नानासाहेब लगड( रा. शिरसगाव बोडखा ता. श्रीगोंदा) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे . श्रीगोंदा पोलिसांनी भा. दं. वि.कलम ३०२, ४९८ ( अ) व ३४ प्रमाणे गुन्हा र.नं. आय ७७२ /२०१७ ने दाखल करून घेतली आहे.

फिर्यादीत म्हटल्या प्रमाणे, माझी मुलगी वैशाली हिचा विवाह ६ डिसेंबर २००७ रोजी वांगदरी येथील विकास भिकाजी नागवडे याचे बरोबर करून दिला. पहिली दोन वर्षे तिला व्यवस्थित नांदविले. पण मूलबाळ होत नसल्याने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरु केला. जीप घेण्यासाठी माहेरून पन्नास हजार रुपये आणण्याचा तगादा लावला.नवरा, सासू व सासरे तिला मारहाण करून उपाशी ठेवीत असत. १२ मे २००९ रोजी वरील कारणास्तव या लोकांनी तिला मारहाण करून घरातून हाकलून दिले. 


त्यावेळी तिने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भा. दं. विधान कलम ४९८ (अ) , ३२३, ५०४,५०६, ३४ अन्वये पती, सासू व सासरे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला होता. गुन्हा र. नं. आय २२१/२००९ वर तो गुन्हा नोंदवून न्यायालयात पाठविलेला आहे. दरम्यान पती विकास याने वैशालीच्या विरोधातही घटस्फोटाकरिता कोर्टात अर्ज दाखल केला होता.

वरील दोन्ही प्रकरणात नातेवाईकांनी तोंडी तडजोड करून तिला नांदावयास पाठविले होते. नंतर तिला आदित्य नावाचा मुलगा झाला.त्यानंतर पुन्हा तिचा माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून छळ सुरु झाला.तिला मारहाण करून पुन्हा माहेरी हाकलून दिले.वैशाली व तिचा मुलगा आदित्य यांनी सन २०१४ मध्ये सासरच्या लोकांविरुध्द हिस्से वाटपाचा दावा दाखल केला.त्यामुळे पती विकास याने नमते घेऊन तडजोड करण्याची विनंती केली .आम्ही वैशाली हिला नांदावयास पाठविले दीड वर्षापूर्वी तिला दुसरा मुलगा झाला.पण तिचा सासुवास कमी झाला नाही. माहेरून पैसे आणण्यासाठी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास पुन्हा सुरु झाला.

२१ नोव्हेंबर २०१७ च्या रात्री १२ ते साडे बाराच्या सुमारास ढोकराई येथील साठे वस्तीवरील तिच्या राहत्या घरात सासू व सास-यांनी तिला घट्ट धरून ठेवले आणि पती विकासने रॉकेल ओतून पेटवून दिले. त्याच दरम्यान यवत येथे कामानिमित्त गेलेला माझा थोरला मुलगा गणेश रामदास लगड हा परत येत होता. एवढ्या रात्री ढोकराई येथे गर्दी पाहून तो थांबला. त्यावेळी वैशालीचे सासू व सासरे ढोकराई वरून वांगदरीकडे जाताना त्याला दिसले. वांगदरीचे काही लोक तिथे उभे होते.काय झाले म्हणून त्याने लोकांना विचारले. 

त्यावेळी वैशालीच्या घराकडे लोकांनी बोट केले. तो तिथे गेला त्यावेळी जळालेली वैशाली त्याला म्हणाली, सासू व सास-याने धरून ठेवले आणि नव-याने रॉकेल ओतून पेटवून दिले.हे सांगितल्यावर ती बेशुध्द झाली. तिला गणेशने दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला परंतु ती मरण पावली. ही सर्व हकीगत गणेशने आम्हाला फोनवर सांगितली. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षण निलेश कांबळे अधिक तपास करीत आहेत.