Breaking News

माऊथवॉश वाढवू शकतो मधुमेहाचा धोका.

माउथवॉशचा नियमित वापर करणाऱ्या लोकांमध्ये मधुमेहाचा धोका वाढू शकतो, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अध्ययनात असे दिसून आले की, जीवाणूरोधक द्रवपदार्थाद्वारे तोंड स्वच्छ केल्याने तोंडात राहणारे तसेच लठ्ठपणा व मधुमेहापासून सुरक्षा करणारे जीवाणू नष्ट होऊ शकतात. 


जे लोक दिवसातून दोनदा माउथवॉशचा वापर करतात, त्यांच्यात मधुमेह वा खतरनाक रक्तातील साखरेचा धोका सुमारे ५५ टक्के वाढण्याची शक्यता असते. हार्वर्ड स्कुल ऑफ पब्लिक हेल्थच्या प्राध्यापक कौमुदी जोशिपुरा यांनी सांगितले की, माउथवॉशमधील बहुतांश जीवाणूरोधक घटक घातक नाहीत. ते तोंडातील विशिष्ट जीवाणूंना लक्ष्य करत नाहीत. त्याऐवजी हे घटक व्यापक पातळीवर जीवाणूंवरच कारवाई करू शकतात. 

या अध्ययनात ४० ते ६५ वयोगटातील १२०६ लठ्ठ व्यक्तीचा समावेश करण्यात आला होता. त्यांच्यात मधुमेह होण्याचा धोका जास्त होता. कौमुदी यांच्या मते, तोंडातील हे मदतगार जीवाणू मधुमेह आणि लठ्ठपणापासून सुरक्षा करू शकतात. त्यांच्यात शरीरातील इन्सुलिनच्या पातळीला नियंत्रित करण्यास मदतर करणाऱ्या नायट्रिक ऑक्साइडच्या निर्मितीस मदत करणाऱ्या जीवाणूंचाही समावेश असतो.