रोज तीन-चार कप कॉफीचे सेवन करते मृत्यूचा धोका कमी.
दिवसातून तीन ते चार कप कॉफीचे सेवन तुम्हाला मृत्यूच्या धोक्यापासून दूर ठेवू शकते. ब्रिटनमधील साउथॅम्पट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी आपल्या ताज्या अध्ययनाआधारे हा दावा केला आहे. कॉफीचे सेवन करणाऱ्यांच्या तुलनेत कॉफी न घेणाऱ्या लोकांमध्ये ह्रदयरोगाचा धोका जास्त असतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
याआधी झालेल्या दोनशेंहून जास्त अध्ययनांची समीक्षा करून शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, कॉफी पिण्याचा संबंध काही प्रकारचा कर्करोग, मधूमेह, यकृताचे आजार आणि डिमेन्शियाचा धोका कमी करण्यासोबतही आहे. बीएमजे नामक नियतकालिकात ही समीक्षा प्रसिद्ध झाली आहे. कॉफी सेवनामुळे आरोग्याचे नुकसान होण्याऐवजी लाभच जास्त होतो, असे त्यात दिसून आले.
शास्त्रज्ञांनी सांगितले की, दिवसातून तीन ते चार कप कॉफी पिणाऱ्या लोकांना कॉफी न पिणाऱ्या लोकांच्या तुलनेत मृत्यूचा धोका कमी असतो. अर्थात गर्भावस्थेदरम्यान कॉफीचे सेवन हानीकारक ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. कॉफीसेवनाचा आरोग्यावर होणारा परिणाम चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ साउथॅम्पटनचे रॉबिन पुले यांच्या नेतृत्त्वाखालील एक चमूने २०१ अध्ययनांची समग्र समीक्षा केली.